पित्याच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी सरसावल्या चारही मुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:29 PM2019-03-30T23:29:26+5:302019-03-30T23:29:40+5:30
जन्मदात्याची इच्छा पूर्ण
जामनेर / वाकोद : पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप होत चालली आहे. याचाच प्रत्यय जामनेर येथे येऊन मुलींनी आपल्या पार्थिवाला खांदा देत एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे.
जामनेर येथील प्रतिष्ठित व्यापारी व नवजीवन प्रोव्हिजनचे संचालक राजकुमार राणुलाल बोहरा (४९) यांचे २९ रोजी संध्या. ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांना जैन धर्मा नुसार संथारा व्रत धारण करण्यात आले होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवार ३० रोजी सकाळी १० वाजता आनंद नगर येथून त्यांच्या राहत्या घरून निघाली. राजकुमार बोहरा यांना चार मुली व एक मुलगा असल्याने त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी चारही मुली पुढे सरसावल्या. यातील एक मुलगी विवाहित असून तीन मुली अविवाहित आहे तर मुलाचे वय १४ वर्ष आहे. नेहा, प्रिया, यशस्वी, तेजस्वी यांनी दु:खात स्वत:ला सावरून पित्याच्या पार्थिवाला खांदा दिला. या निर्णयाचे सगळ्यांनी बळ देत राजकुमार बोहरा यांची अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
चार मुलींच्या जन्मदात्या बापाला त्याच मुलींनी खांदा देत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केल्याचा अनुभव या ठिकाणी आला. जामनेर येथे मुलीच्या खांद्यावरून निघालेली कदाचित ही पहिलीच अंत्ययात्रा नव्या युगाची नांदी ठरली आहे. राजकुमार बोहरा यांच्या वाट्याला मुलींच्या खांद्याचे भाग्य लाभले, असा सूर या वेळी ऐकवयास मिळाला. वडिलांच्या निधनानंतर सामाजिक प्रथेची कुठलीही तमा न बाळगता खांदा देण्याचे कार्य मुलींनी पार पाडले. येथील या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार ठरलेल्या नागरिकांनी या घटनेची प्रशंसा केली आहे. मुलींनी आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श स्थापित केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राजकुमार बोहरा यांच्या अवघ्या वयाच्या ४९ व्या वर्षी अकाली निधनाने दीर्घ आयुष्य लाभलेल्या आई व पित्याला अश्रूंचा बांध फुटला होता.