चक्रीवादळामुळे गुजरातकडे जाणाऱ्या चार एक्स्प्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:08+5:302021-05-17T04:14:08+5:30
खबरदारी : तर गांधीधाम व रामेश्वरम्-ओखा एक्स्प्रेस अहमदाबादपर्यँतच धावणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र, गुजरात व केरळच्या किनारपट्टीवर ...
खबरदारी : तर गांधीधाम व रामेश्वरम्-ओखा एक्स्प्रेस अहमदाबादपर्यँतच धावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र, गुजरात व केरळच्या किनारपट्टीवर ''तौक्ते'' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे गुजरातकडे जाणाऱ्या चार सुपरफास्ट गाड्या रद्द केल्या आहेत. पुरी-गांधीधाम व रामेश्वरम्-ओखा एक्स्प्रेस अहमदाबादपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे गुजरातकडे जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा चक्रीवादळामुळे चार सुपरफास्ट रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या चार गाड्या तीन दिवस रद्द केल्या आहेत. तसेच गुजरातकडून येतानाही या गाड्या रद्द राहणार आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या या चार गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर गाडी क्रमांक (०२९७४) पुरी-गांधीधम एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०६७३३) रामेश्वरम्-ओखा एक्स्प्रेस या दोन्ही सुपरफास्ट गाड्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर फक्त अहमदाबादपर्यंतच चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, या सर्व गाड्यांना जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.
इन्फो :
चक्रीवादळामुळे या गाड्या आहेत रद्द...
तौक्ते या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगावमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या चार गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये गाडी क्रमांक (०९२०६) हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८४०१) पुरी-ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०९०९४) पोरबंदर एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०९२३८) राजकोट-रेवा एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
इन्फो :
तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार
रेल्वे प्रशासनातर्फे चक्रीवादळामुळे ज्या गाड्या रद्द केल्या आहेत, त्या गाड्यांचा पूर्ण परतावा प्रवाशांना देण्यात येणार आहे. तिकिटांचा परतावा घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.