आडगाव येथे आगीत घरासह चार गोठे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:35 PM2018-01-18T16:35:54+5:302018-01-18T16:39:56+5:30
सुदैवाने जिवितहानी टळली मात्र वीस हजाराची रोकड खाक
आॅनलाईन लोकमत
यावल, दि.१८ : तालुक्यातील आडगाव येथे बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत घरासह चार शेतकºयांचे गोठे जळून खाक झाले. सुदैवाने जिवितहानी टळली मात्र आगीत संसारपयोगी साहित्यासह घरातील २० हजाराची रोकड जळून खाक झाली. दरम्यान आग विझविताना नितीन प्रल्हाद साबळे हे गंभीर जखमी झाले.
यावल-चोपडा रस्त्यावरील आडगाव येथील श्री मनुदेवी मंदिराच्या रस्त्यावरील सुमनबाई भगवान पाटील यांच्या राहत्या घरास बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. यात त्यांच्या घरातील २० हजार रुपयांची रोकडसह संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. चार शेतकºयांच्या गोठ्याला आग लागली. त्यात सचिन गोकुळ पाटील यांचे ६९ हजार ७००, प्रल्हाद सीताराम पाटील यांचे ३५ हजार ३००, सुकलाल पाटील यांचे ७५ हजार २०० आणि मोतीलाल पाटील यांचे ५९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान,नितीन साबळे हे शेतकºयांच्या गोठ्यातील गुर सोडताना आगीत गंभीरपणे भाजले गेले आहेत. शिवाय त्यांची दुचाकीदेखील आगीच्या भक्षस्थानी सापडली. सुमनबाई यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळाल्याने त्या निराधार झाल्या आहेत. गुरूवारी पहाटे आडगावचे तलाठी एम. एच. तडवी यांनी आगीच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.