पुरात बुडून चार जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 09:24 PM2019-09-19T21:24:15+5:302019-09-19T21:24:20+5:30
जोरदार पाऊस : नदी व नाल्यांमध्ये पाणीच पाणी
जळगाव : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून नदी व नाल्यांंना पूर आले आहेत. या पुरात वेगवेळ्या ठिकाणी चार जणांना जलसमाधी मिळाली आहे. धरणगाव, पाचोरा, जामनेर व अमळनेर तालुक्यात या घटना घडल्या.
एका घटनेत धरणगाव तालुक्यात पष्टाणे येथील नाल्याच्या पूरात हातपाय धूण्यासाठी गेलेल्या रामभाऊ एकनाथ पाटील ( वय ४५ ) या शेतकऱ्याचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. १९ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घडली. दुसºया घटनेत पाचोरा येथे हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला जयेश दत्तात्रय महाजन (वय २२ रा. शिव कॉलनी पाचोरा) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी ४ वाजेचे सुमारास पाचोरा शहराजवळील वीट भट्टी परिसरात खोल पाण्यात आढळून आला. तिसºया घटनेत पातोंडा ता.अमळनेर येथील सुटवा नाल्यात बुडून राहुल रमेश देवरे (धोबी) (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला. सोनखेडी येथून चार आणण्यासाठी तो नदी पोहून पार करत असताना ही घटना गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. तसेच जामनेर तालुक्यात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कांग नदी पात्रात वाहून गेलेल्या अनिल मोतीलाल राजपुत (वय ४४, रा. जामनेरपुरा) या प्रौढाचा मृतदेह १९ रोजी दुपारी हिवरखेडे जवळ आढळला.
हतनूरचे चार तर गिरणाचे आणखी २ दरवाजे उघडले
जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक सुरु असल्याने गिरणा धरणाचे २ तर हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. वाघूर धरणातही समाधानकारक साठा झाला असून सुमारे ९० टक्के ते भरले आहे.