जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:46 PM2018-07-29T12:46:58+5:302018-07-29T12:48:19+5:30
चोरटा निसटला
जळगाव : घरातील महिला वरच्या मजल्यावर असल्याची संधी साधत चोरट्यांनी लोखंडी दरवाजा सरकवून विलास रघुवीर गुप्ता (रा.भगवती नगर, कानळदा रोड, जळगाव) यांच्या घरातून चार लाख रुपये किमतीचे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, एका चोरट्याला घरातून पळताना महिलांना पाहिले तर आणखी एक जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चोरट्याने ट्रान्सफार्मरवर जाऊन वीज पुरवठा खंडीत केला
विलास गुप्ता यांचा फरसानचा व्यवसाय आहे. भगवती नगरात त्यांचे दोन मजली घर आहे. गुप्ता यांचे भाऊ व पत्नी असे सायंकाळी शहरात कामानिमित्त आले होते तर त्यांच्या दोन सूना लहान मुलांना वरच्या मजल्यावर खेळवत होते. सायंकाळी एका चोरट्याने ट्रान्सफार्मरवर जाऊन वीज पुरवठा खंडीत केला. एक जण बाहेर लक्ष ठेवत असताना दुसºयाने घरात जावून मुलगा सचिन व विशाल या दोघांच्या खोलीत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लांबविले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
लग्नात आलेले दागिने लांबविले
वीज पुरवठा बंद झाल्याने वरच्या मजल्यावरील सून खाली येत असताना त्यांना एक जण घरातून पळताना दिसला. घरात येऊन पाहिले तर सामान अस्ताव्यस्त होता व कपाटही उघडे होते. दोघं सुनांना लग्नात आलेले सोने चोरट्यांनी लांबविले. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण संशयास्पद फिरताना दिसून येत असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दिली. चोरी करण्याआधी या चोरट्यांनी वीज पुरवठा खंडीत केला होता.