डॉक्टरांकडे चार लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:19 AM2019-07-28T01:19:08+5:302019-07-28T01:19:33+5:30
रोख रक्कम व दागिने लांबविले; कुटुंब होते नाशिकला
जळगाव : नाशिक येथील मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या डॉ.बाळकृष्ण सोनू नेहते यांच्या गांधी नगरातील घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने मिळून चार लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. शुक्रवारी श्रध्दा कॉलनीतील नंदनवन कॉलनीत भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी झाल्यानंतर लागलीच शनिवारी ही घटना उघडकीस आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बाळकृष्ण नेहते हे गांधीनगर येथे पत्नी प्रा.डॉ.अलका उर्फ गीता यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांची दोन्ही मुले अनुक्रमे डॉ.अमीत व डॉ. पराग नेहेते हे नाशिक येथे वास्तव्यास आहेत. या मुलांना भेटण्यासाठी नेहेते दाम्पत्य रविवार दि.२१ जुलै रोजी येथील घराच्या दरवाजाला कुलुप लावून नाशिक येथे गेले होते. त्यामुळे घर बंद होते.
कंपाऊंडरच्या लक्षात आली घटना
दवाखान्यातील कंपाऊंडर भिका महाजन हा शनिवारी सकाळी डॉ.नेहते यांच्या घराच्या आवारातील झाडांना पाणी देण्यासाठी आला असता त्याला लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा व कुलुप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती शेजारी राहणारे दिलीप नारखेडे यांना दिली. नंतर नारखेडे यांनी डॉ.बाळकृष्ण नेहते यांना मोबाईलवरुन घटनेची माहिती दिली.
त्यामुळे डॉ.नेहते तातडीने दुपारी जळगावला पोहचले. घरातील साहित्याची नासधूस झालेली होती. कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपये रोख व दागिने असा चार ते साडे चार हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, डॉ.नेहते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनाही ठशांचे नमुने घेतले.