नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून चार लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:56+5:302021-03-08T04:15:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच सार्वजनिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणांवर व लग्नसमारंभामध्येदेखील गर्दी न करण्याबाबत नियम आखून दिले आहेत. मात्र तरीही शहरात प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून चार लाख ७२ हजार रुपयांची वसुली केली आहे. तसेच कोरोनाकाळात प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर यापुढे दंडासह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियादेखील राबविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एकीकडे प्रादुर्भाव वाढत असतानाही शहरातील नागरिक गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. यामुळे मनपा प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली आहे. यासह लग्नसमारंभ व विविध कार्यक्रमात गर्दी करणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत मनपा प्रशासनाने मास्क न घालणाऱ्या २०७ जणांना दंड केला आहे, तर गर्दी करणाऱ्या १४ मंगल कार्यालय व लॉन्सच्या मालकांवरदेखील प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. यासह किरकोळ विक्रेत्यांवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात आली आहे.
मोहीम अधिक तीव्र होणार
शहरात आता दररोज कोरोनाचे ३००हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तरीही बाजार पट्ट्यात अनेक नागरिक बेजबाबदारपणे मास्क न घालताच फिरत आहेत. यासह अनेक भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचेही निदर्शनात येत आहे. त्यामुळे महापालिकेकडून कारवाईची मोहीम अधिक तीव्र होणार आहे तसेच ज्या दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर गर्दी आढळून येईल, अशी दुकाने सील करून दुकानमालकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
९० टक्के नागरिक घालताहेत मास्क; मात्र गर्दीवर नियंत्रण नाही
मनपाच्या कारवाईनंतर शहरातील नागरिकांवर काही प्रमाणात शिस्त लागलेली दिसून येत आहे. बाजारपट्ट्यात अनेक नागरिक तोंडाला मास्क लावूनच फिरत आहेत. मात्र शहरातील गर्दीवर अंकुश लावण्यात आतापर्यंत मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. आठवडे बाजार बंद असला तरीही गल्लीबोळात अनेक विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे गर्दी होतच आहे. याबाबतदेखील मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मास्क न लावणाऱ्यांकडून वसूल रक्कम - एक लाख ३२ हजार
मंगल कार्यालय चालकांकडून वसूल रक्कम - तीन लाख ३४ लाख