चार महिन्यांचा कोरोनाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:25+5:302021-02-23T04:23:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढता वाढता कोरोनाने अखेर दोनशेचाही टप्पा ओलांडला असून रविवारी जिल्ह्यात २१६ रुग्णांची भर पडली ...

Four-month corona high | चार महिन्यांचा कोरोनाचा उच्चांक

चार महिन्यांचा कोरोनाचा उच्चांक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढता वाढता कोरोनाने अखेर दोनशेचाही टप्पा ओलांडला असून रविवारी जिल्ह्यात २१६ रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ७९ तर चाळीसगावात ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे दोनही ठिकाणे गेल्या आठवडाभरापासून हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कडक निर्बंध लागण्याची शक्यता अधिक दाट झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यात जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसमोर येत आहेत. त्यात सरासरी ७८ रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेत भर पडली आहे. नवे रुग्ण अधिक आणि बरे होणाऱ्यांची संख्या कमी असे चिंताजनक चित्र असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या चारच दिवसात १०६६ वर पोहोचली आहे. यात ७३० रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असून उर्वरित आरेाग्य यंत्रणेत उपचार घेत आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढून ३२६ झालेली आहे. यात ऑक्सिजनची गरज असणारे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आतातरी नियम पाळावे, लक्षणे आल्यास चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ऑक्टोबर नंतर प्रथमच २०० रुग्ण

१२ ऑक्टोबर २०२० मध्ये २११ रुग्ण नोंदविण्यात आले होते. चार महिने दहा दिवसातील रुग्णवाढीचा रविवारी उच्चांक नोंदविण्यात आला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात शंभर रुग्णही नोंदविण्यात आलेले नव्हते. मात्र, १५ फेब्रुवारीपासून शंभरापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहे.

चिंता वाढविणारे आकडे

एका दिवसात बाधित : २१६

सक्रिय रुग्ण : १०६६

प्रलंबित अहवाल : ११४९

ॲन्टीजन पॉझिटिव्हिटी : १६.३८ टक्के

जळगाव शहरातील रुग्ण : ७९

चाळीसगावातील रुग्ण : ५४

ऑक्सिजन वरील रुग्ण : ७३

आयसीयूमधील रुग्ण : ४९

स्वतंत्र पॉइंटर

दिलासा : मृत्यूदर घटला : २.३४ टक्के

चिंता : रिकव्हरी रेट घटला: ९५.८४ टक्के

४७ वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना बाधित जळगाव शहरातील एका ४७ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. ५० वर्षाखालील मृत्यू चिंता वाढविणारा आहे. मात्र, अन्य व्याधी असणे, मोठ्या प्रमाणात संसर्ग असणे या बाबी कमी वयाच्या मृत्यूमागे कारणीभूत असतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

चाचण्या वाढल्या

रविवारी १११३ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून ९०४ अहवाल समोर आले तर ॲन्टीजच्या ७१४ चाचण्या जिल्हाभरात झाल्या आहेत. यात अनुक्रमे ९९ आणि ११७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, आरटीपीसीआर चाचणी करूनही आता विलगीकरणात ठेवले जात नसल्याने प्रलंबित अहवालांची संख्याही चिंता वाढविणारी आहे. चाचणी झाल्यावरही काही जण बिनधास्त बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.

सर्व भागात रुग्ण ही चिंतेची बाब

शहरातील सर्वच भागात रुग्ण समोर येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे, रोज नवे हॉटस्पॉट समोर येत आहे. यात रविवारी भवानी पेठ ५ या भागात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यासह भिकमचंद जैन नगर ३, गुजराल पेट्रोल पंप २, प्रोफेसर कॉलनी २, बीबा नगर २, गणेश कॉलनी, रिंगरोड, अयोध्यानगर, मुक्ताईनगर, राका पार्क, आराधना कॉलनी, बालाजी पेठ, रामदास कॉलनी, साईनगर, वर्षा कॉलनी, जीवननगर, सदाशिव कॉलनी, ओंकारेश्वर मंदिराजवळ, भूषण कॉलनी, जय नगर, वाटीका आश्रम, जय निवास, रायसोनीनगर तानाजी मालुसरे नगर या भागात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळून आला आहे.

Web Title: Four-month corona high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.