मुंबईच्या पोलिसाला जळगावात मारहाण करुन चौघांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:32 PM2018-11-11T12:32:05+5:302018-11-11T12:32:49+5:30
दोघांना अटक
जळगाव : दिवाळीच्या सुटीनिमित्त घरी आलेल्या पंकज दिनकर सोनवणे (वय ३२, रा.डोंबिवली जि.ठाणे, ह.मु.ममुराबाद, ता.जळगाव) या पोलिसाला अपघात झाल्यानंतर चौघांनी मारहाण करुन लुटल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता ममुराबाद कृषी संशोधन केंद्राजवळ घडली. याप्रकरणी जबरी लुटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर केशव संतोष सपकाळे (वय २७, रा.धामणगाव, ता.जळगाव) व योगेश गोपीचंद सपकाळे (वय ३२, रा.नांद्रा, ता.जळगाव) या दोघांना अटक झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पंकज सोनवणे हे दिवाळीनिमित्त ममुराबाद येथे आई व वडीलांना भेटण्यासाठी आले होते.
जळगाव पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असलेला भाऊ दीपक यांना ८ नोव्हेंबर रोजी भेटण्यासाठी पंकज शहरात आले होते. मात्र भावाची भेट न झाल्याने दुचाकीने (क्र.एम.एच.१९ जी.३९९९) ममुराबाद येथे परत जात असताना कृषी संशोधन केंद्राजवळ समोर येणाऱ्या कारला ओव्हरटेक करुन एक दुचाकीस्वार वेगात आला व त्यामुळे पंकज यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार खाली कोसळले. यावेळी तेथे जमलेल्या केशव संतोष सपकाळे, विकास सदाशिस नन्नवरे, किसन नन्नवरे व योगेश गोपीचंद सपकाळे चौघांनी पंकज यांना मारहाण करायला सुरुवात केली.
दरम्यान, अटकेतील दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्या.एम.एम.चौधरी यांनी १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड.अविनाश पाटील यांनी तर बचाव पक्षातर्फे अॅड.कुणाल पवार यांनी काम पाहिले.
कारमध्ये मारहाण करुन लुटले
दोन्ही दुचाकीवरील जखमींना रुग्णालयात नेण्याच्या नावाखाली चौघांच्या मित्राच्या कारमध्ये टाकून पंकज यांना चौघांनी पुन्हा मारहाण केली. यावेळी खिशातील ४८ हजार रुपये रोख, ५० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची साखळी व दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. या चौघांना वाहन शहर पोलीस स्टेशनला नेण्याचे सांगितले असता, त्यांनी पुन्हा त्याच जागेवर सोडून पलायन केले, नंतर मित्र मनोज पाटील याला बोलावून तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.