महिलेसह चार जणांनी संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:23 PM2020-06-16T12:23:20+5:302020-06-16T12:23:33+5:30
जळगाव : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह चार जणांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. यात १२ वीत शिकणाऱ्या एका ...
जळगाव : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह चार जणांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. यात १२ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
शिवाजीनगर भागातील लक्ष्मीनगरात रविवारी दुपारी रूख्मिणी संतोष अरसूल या विवाहिताने साडीच्या सहाय्याने घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ परंतु, अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. लक्ष्मीनगरात रूख्मिणी अरसूल या पती, मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होत्या़ पती हात मजुरी करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात़ दरम्यान, रविवारी दुपारी दोन्ही मुलं घराबाहेर होती तर पती बाहेर गेले असता रूख्मिणी यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्या़ काही वेळानंतर ही बाब उघडकीस येताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला़ त्यानंतर रूख्मिणी यांच्या माहेरच्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली़ याबाबत डॉ़ अतुल पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़
तक्रारीसाठी माहेरच्यांनी गाठले पोलीस ठाणे
औरंगाबाद जिल्ह्यातील बीड हे मयत विवाहितेचे माहेर आहे़ रविवारी दुपारी घटनेची माहिती मिळताच सोमवारी सकाळी त्यांचे आई-वडील व भावाने जळगाव गाठले़ नंतर जावयाविरूध्द तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाणे गाठले. आत्महत्या करण्याच्या एक दिवसाआधी रूख्मिणी यांनी त्यांच्या आईला मोबाईलद्वारे संपर्क साधला होता़ त्यात त्यांनी पती सध्या घरीच असून दोन दिवसांपासून मुलं सुध्दा उपाशी आहेत़ त्यामुळे तणावात असल्याचे सांगितले़ त्यावेळी त्यांच्या आईने धीर देत मदत करून असे सांगितले़ अशी माहिती मयत विवाहितेच्या आई-वडीलांनी ‘लोकमत’ ला दिली़ तर पतीकडूनही त्रास दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला़
- प्रतापनगरातील राजेश अमृतलाल चौधरी (५१) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ राजेश हे कुटूंबासह प्रतापनगरातील भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. नैराश्येतून दुपारी दोन वाजता गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, त्यांची पत्नी, मोठा मुलगा दवाखान्याच्या कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी भुसावळ येथे गेले होते. तर घरातील लहान मुलगा दुसºया खोलीत होता. ही घटना काही वेळाने त्याच्या लक्षात आली. राजेश चौधरी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डॉ़दीपक जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास चंद्रकांत पाटील करीत आहेत.
- मोहाडी शिवार... शहरातील मोहाडी शिवारात विशाल जाधव (वय १९) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली़ बाहेर गेलेला त्याचा भाऊ घरी आले असता प्रकार उघडकीस आला. विशाल यावर्षी बारावीच्या वर्गात गेला होता. त्याचे वडील कपडे इस्रीचा व्यवसाय करतात.त्याच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. याबाबात पोलिसात खबर देण्यात आली आहे़
मन्यारखेडा येथे तरुणाची गळफास
४नशिराबाद : मन्यारखेडा शिवारात विनोद हिरामण मोरे (२७, मन्यारखेडा) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपली. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजण्यापूर्वी घडली. मन्यारखेडा शिवारात ज्ञानेश्वर निळे यांच्या शेताच्या बांधावरील झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. याबाबत सुनसगावचे पोलीस पाटील प्रकाश महारु मालचे यांनी खबर दिल्यावरून नशिराबाद पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, शांताराम तळेले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.