वरणगाव येथे सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीची गोळी सुटल्याने चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 03:41 PM2019-08-20T15:41:18+5:302019-08-20T15:41:28+5:30
सेंट्रल बँकेच्या शाखेतील घटना : सुरक्षा रक्षक ताब्यात
वरणगाव, ता. भुसावळ : सेंट्रल बँकेच्या वरणगाव -शाखेतील सुरक्षा रक्षकाकडून बॅँकेत ड्यूटी बजावत असताना अनावधानाने बंदुकीचे ट्रीगर दाबला गेल्याने गोळी सुटून त्यात तीन महिलांसह एक इसम किरकोळ जखमी झाले. मंगळवारी दुपारी १.३० ते १.४५ वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. जखमींवर तातडीने खाजगी तसेच ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.
या संदर्भात वृत्त असे की, सेंट्रल बॅँकेचा सुरक्षा गार्ड लखीचंद चौधरी, रा. तापी नगर भुसावळ हा नेहमीप्रमाणे बॅँकेजवळ ड्यूटी बजावत होता. यावेळी बॅँकेत ग्राहकांची बरीच गर्दी होती. ग्राहक बाहेरील खुर्च्यांवर बसले होते. दुपारी १.३० ते १.४५ वाजेच्या दरम्यान सुरक्षा रक्षकाने भिंतीला लटकविलेली बंदुक काढत असताना अनावधानाने बंदुकीचा ट्रीगर दाबला जाऊन बंदुकीतून गोळी सुटली यामुळे बॅँकेच्या रांगेत बसलेले प्रमिला वंसत लोहार (रा. तळवेल), शोभा प्रकाश माळी (रा. वरणगाव) , राधेशाम छबिलदास जैसवाल (रा. वरणगाव ) , कलाबाई चौधरी , (रा. वरणगाव) यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्याच्यावर खाजगी तसेच ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरक्षा रक्षक हा सैन्यदलातील निवृत्त कर्मचारी असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदिपकुमार बोरसे, हे.कॉ. सुनील वाणी, गणेश शेळके, राहूल येवले व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षा रक्षक लखीचंद चौधरी यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती. तसेच बॅँक कर्मचाऱ्यांचीही बरीच धावपळ झाली.