२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले चारजण स्थानबद्ध; प्रथमच एकाचवेळी एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिघांवर एमपीडीए
By विजय.सैतवाल | Published: September 30, 2023 05:28 PM2023-09-30T17:28:20+5:302023-09-30T17:28:33+5:30
हातभट्टी दारू विक्रीसह चोरी, हप्ता वसुली व अन्य गंभीर गुन्हे करीत जळगावकरांसाठी धोकादायक ठरलेल्या चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जळगाव: हातभट्टी दारू विक्रीसह चोरी, हप्ता वसुली व अन्य गंभीर गुन्हे करीत जळगावकरांसाठी धोकादायक ठरलेल्या चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकाचा समावेश असून अन्य तीनजण रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एकाचवेळी एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जणांवर एमपीडीए करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) (२४, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध दारूबंदी कलमांसह अन्य एकूण नऊ गुन्हे दाखल आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पोकॉ साईनाथ मुंडे, संदीप धनगर यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता.
यासोबतच रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३ गुन्हे, चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाई, एक अदखलपात्र गुन्हा दाखल असलेला राहुल नवल काकडे (२४, रा. समतानगर, जळगाव), सात गुन्हे, एक प्रतिबंधात्मक कारवाई, दोन अदखलपात्र गुन्हे दाखल असलेला सचिन अभयसिंग चव्हाण (२४, रा. गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा), १३ गुन्हे दाखल असण्यासह एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेला नितेश ऊर्फ गोल्या मिलिंद जाधव (२४, रा. मढी चौक, पिंप्राळा) हे शहरवासीयांसाठी धोकेदायक ठरले होते. या तीन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चारही जणांना स्थानबद्धचे आदेश दिले. त्यानुसार संतोष राऊत याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. तसेच राहुल काकडे, सचिन चव्हाण यांना येरवडा, पुणे कारागृहात तर नितेश जाधव याला ठाणे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी या कारवाईचे काम पाहिले आहे.
सहा महिन्यात एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऊ जण स्थानबद्ध
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून सहा महिन्यात रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऊ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात सर्वात जास्त एमपीडीएच्या कारवाया या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर झाल्या आहे.