महापालिकेकडून चार दुकाने सील ; शहरातील गर्दी मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:03+5:302021-04-20T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून येत नाही. तसेच शहरातील दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. तसेच अनेक हात गाड्या देखील महापालिकेकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरातील अनेक दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून महापालिकेचा पथका विरोधात जाऊन लपून छपून व्यवसाय सुरू आहे. सोमवारी देखील शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट व इतर भागातील अनेक दुकाने सुरू आढळून आले. विशेष म्हणजे काही दुकाने अर्धे शटर लावून सुरू होते. तर काही दुकानांमध्ये ग्राहक आल्यावर दुकाने उघडली जात होती व ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देऊन परत दुकाने बंद केली जात होती. सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा पथकाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. यासह मुख्य बाजारपेठ भागातील १८ विक्रेत्यांवर कारवाई करून , काही जणांचा माल देखील जप्त करण्यात आला.
मनपाचे पथक येताच व्यवसाय बंद, पथक परतताच व्यवसाय सुरू
शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक परिसर व बळीराम पेठ भागातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मनपा पथकाच्या विरोधात जणू लपंडावाचा खेळ सुरू केल्याचे चित्र शहरातील बाजारपेठ परिसरात दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेपासून याठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेते जमा होत असतात. मात्र महापालिकेचे पथक येण्याअगोदरच सर्व विक्रेते आपआपला माल परिसरातील काही घरांमध्ये व दुकानांमध्ये लपवित असल्याचेही पहावयास मिळत आहे. अनेक विक्रेते आपला व्यवसाय न करता केवळ मनपाच्या पथकाकडे लक्ष ठेवून असतात. मनपाचे पथक महापालिकेतून निघाल्यानंतर तत्काळ विक्रेत्यांना माहिती दिली जाते. मनपाचे पथक येण्याअगोदरच ह्या भागातील दुकाने बंद होतात. तर विक्रेते देखील गायब होत असतात, तसेच मनपाचे पथक परतल्यानंतर या भागातील दुकाने पुन्हा सुरू होतात व भाजीपाला विक्रेते देखील आपली दुकाने शहरात थाटतात.
नागरिक देखील झाले अधिक बेजबाबदार
महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील ९ ठिकाणे व्यवसाय करण्यासाठी निश्चित करून दिली आहेत. मात्र या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. भाजीपाला विक्रेते अजूनही शहरातील मुख्य बाजारपेठ भागात व्यवसाय करत आहे. या ठिकाणी व्यवसाय करण्यामागे ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर ज्या भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत त्याठिकाणी ग्राहक देखील जात नसल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. नागरिकांनी जर महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी केली तर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात होणारी गर्दी टाळता येऊ शकते.