चार तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:02+5:302021-06-16T04:21:02+5:30
(स्टार क्रमांक ८०९) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला असून आता सक्रिय ...
(स्टार क्रमांक ८०९)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला असून आता सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. यात सद्य:स्थितीत जिल्ह्यातील धरणगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा या चार तालुक्यांमध्ये ५० पेक्षा कमी रुग्ण असून या ठिकाणी सातत्याने कमी रुग्णसंख्या नोंदविली जात असून हे तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
दुसऱ्या लाटेत जळगाव शहर आणि चोपडा या भागात सुरुवातीला प्रचंड प्रमाणात संसर्ग वाढला होता. मात्र, ही दोन्ही ठिकाणे सावरत असून जळगाव शहरात तर आठवडाभरापासून एकही मृत्यू नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, चोपडा तालुक्यातही आता ६० रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या आठवडाभरात या ठिकाणी केवळ २७ रुग्णांची नोंद आहे. जळगाव शहरातही सक्रिय रुग्णांची संख्या घटून १७६ वर आली आहे. मध्यंतरीच्या कडक निर्बंधांचाही यात महत्त्वाचा वाटा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत झालेल्या चाचण्या -
१२४३९७८
बाधित होण्याचे प्रमाण - ११. १ टक्के
रुग्ण बरे होण्याचे होण्याचे प्रमाण- ९६.८३ टक्के
एकूण रुग्ण -
१४१५२२
बरे झालेले रुग्ण -
१३७०३९
जळगाव तालुका - २७६
भुसावळ -१८८
अमळनेर -४६
चोपडा - ६०
पाचोरा ९७
भडगाव ३४
धरणगाव २७
यावल ८९
एरंडोल २२४
जामनेर १५२
रावेर १०८
पारोळा ४५
चाळीसगाव ४४०
मुक्ताईनगर ७१
बोदवड ६६
अनलॉकनंतर चाळीसगावात रुग्णवाढ
अनलॉक होऊन आठवड्याचा कालावधी उलटला असून या आठवडाभरात चाळीसगावात सर्वाधिक रुग्णवाढ समोर आली आहे. या ठिकाणीच सर्वाधिक ४४० रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आठवडाभरात चाळीसगावात १२३ रुग्णांची भर पडली आहे. ही कोणत्याही तालुक्याच्या तुलनेत अधिक आकडेवारी आहे. जळगाव शहर व चोपडा हे जे कोरोनाचे हॉटस्पॉट होते. या ठिकाणी या आठवडाभरात अनुक्रमे ८१ आणि २७ रुग्ण आहेत. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात रुग्णवाढ होत असल्याचे चित्र आहे.
कोट
जिल्ह्यात रुग्णसंख्या घटत असली तरी नागरिकांनी कुठेही गर्दी न करता नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ ठेवणे हे नियम तर आहेतच पण लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, यातूनच आपण पुढील धोके टाळू शकू.
-डॉ. बी.टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी