दररोज चार हजार ट्रक करतात ये-जा, तरीही उड्डाणपूल नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:38+5:302021-07-24T04:12:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सर्वात जास्त आणि बेशिस्त रहदारी असलेला चौक म्हणजे अजिंठा चौफुली आहे. मात्र महामार्गाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सर्वात जास्त आणि बेशिस्त रहदारी असलेला चौक म्हणजे अजिंठा चौफुली आहे. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात उड्डाणपूल करण्याच्या यादीतून नेमका हा चौक वगळण्यात आला. शहरात दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक आणि आता अग्रवाल चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र जेथे सर्वात जास्त गरज आहे. तेथे अजिंठा चौफुलीवरच उड्डाणपूल बनवण्यात येणार नाही. त्याऐवजी तेथे एक सर्कल तयार केले जाणार आहे. मात्र हे अडचणीचे ठरू शकते, असा दावा जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने केला आहे. त्याऐवजी तेथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची मागणी केली जात आहे.
शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणात खोटे नगर ते कालंका माता मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाणपूल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुलीजवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना या चौकात उड्डाणपूल करण्याच्या मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी दिले होते.
सर्कलला काय आहे अडचण?
काही वेळा शहरातून मोठे ट्रक ये-जा करतात. सर्कल तयार केल्यास त्या मोठ्या ट्रकला वळण घेण्यासाठी या ठिकाणी पुरेशी जागा मिळणार नाही. तसेच दिवसाला ये-जा करणाऱ्या मालवाहू वाहने, तसेच कार, दुचाकी यांची वाढती संख्या पाहिली तर येथे सर्कल सोयीचे होणार नाही.
भविष्यात वाढू शकते रहदारी
सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर येथे सातत्याने रहिवासी भागाचा विस्तार होत आहे. त्यांना हा चौक ओलांडूनच जावे लागते. संपूर्ण औद्योगिक परिसर, तसेच विमानतळाकडे जाण्यासाठी हाच चौक ओलांडावा लागतो. विमानतळावर भविष्यात विमान फेऱ्या वाढू शकतात. तसेच वैमानिक प्रशिक्षण केंद्रदेखील येणार आहे. त्यामुळे या भागातील रहदारी वाढेल, तरी तेथे उड्डाणपुलाची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
कोट - मोठ्या ट्रकला सर्कलमुळे अडचणी येणार आहेत. त्यामुळे तसेच शहरातील विस्तारित भाग, औद्योगिक वसाहत, विमानतळाकडे जाण्यासाठी हा चौक ओलांडावा लागतो. त्यामुळे भविष्यातील वाढती रहदारी पाहता या भागात उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी आम्ही केली आहे. - जसपालसिंह बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन.
कोट - राष्ट्रीय महामार्गावर बायपास झाल्यानंतर जवळपास ६० टक्के वाहतूक ही शहराच्या बाहेरून जाणार आहे. या रस्त्याच्या आराखड्यात या चौकात सर्कल प्रस्तावित आहे. तरीही सध्या येथे उड्डाणपुलाची वाढलेली मागणी पाहता त्याचाही विचार सुरू आहे. - चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.