एकाच खर्चात उडविला चार लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:59 AM2019-03-24T11:59:01+5:302019-03-24T11:59:39+5:30
नाथजोगी समाजाचा स्तुत्य उपक्रम
महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : लग्न म्हटले म्हणजे बॅण्ड, मंडप, घोडा, जेवणावळ, अमाप खर्च, मानपान,आहेर, यातच वधूपिता किंवा वरपिता कर्जाचा डोंगर डोक्यावर करून घेतात. पण याला अपवाद ठरले ते महिंदळे येथील नाथजोगी समाजाने कमी खर्चात कशी लग्न होतात हे दाखवून दिले. १९ रोजी हे विवाह पार पडले.
महिंदळे परिसरात नाथजोगी (भराडी) समाज वास्तव्यास आहे. यांचा मुख्य व्यवसाय म्हशी पाळून त्यांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात म्हशी घेऊन जातात व तेथेच राहतात. गावोगावी लोकगीते, समाज प्रबोधनपर गाणे म्हणून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यात मुला-मुलींचे लग्न म्हणजे अमाप खर्च. या अमाप खर्चास लगाम कसा घालता येईल हे समाजातील शिक्षित तरूणांनी हेरले व खर्चात बचत म्हणून एकाच मंडपात व एकाच वाद्यात चार लग्नांचा बार उडविला.
विवाह सोहळ्याचे कोडकौतुक
या लग्न सोहळ्यात परगावातील नवरदेव जमवून हे विवाह पार पडले. त्यात पंडित भिका पवार, बोरनार, ता.भडगाव यांचा चिरंजीव विकास, बापू रतन बाबर रोकडा फार्म यांचे चिरंजीव राजेंद्र, रमेश दगा पवार महिंदळे यांचे चिरंजीव दिलीप व रामदास परम शिंदे महिंदळे यांचे चिरंजीव दादाभाऊ यांचा विवाह सोहळा पार पडला.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व नाथजोगी समाज बांधव आबा शिंदे, धोंडू बाबर, आबा माळवे, पंडित बाबर, उत्तम भराडी, विलास भराडी, जगन्नाथ बाबर, समाधान भराडी, रवींद्र पवार यांचे सहकार्य लाभले.
नाथजोगी समाजाचे अध्यक्ष कैलास पवार यांनी समाजाला एकत्र जमवून लग्नात होणारा अमाप खर्च कसा कमी होईल व एकाच खर्चात जास्तीत जास्त लग्न करायचा निर्णय घेतला व धूमधडाक्यात कमी खर्चात एकाच मंडपात चार लग्नाचा बार उडवला. यात प्रत्येक वरपित्याचे एक ते दीड लाख रुपये वाचले. १९ मार्च रोजी हा सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.