चारचाकीची दुचाकीला धडक, शिक्षक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:53+5:302021-08-22T04:20:53+5:30
अमळनेर : पत्नीसह मोटारसायकलवर जाणाऱ्या शिक्षकाच्या मोटारसायकलला चारचाकीने धडक दिल्याने शिक्षक जागीच ठार होऊन पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना ...
अमळनेर : पत्नीसह मोटारसायकलवर जाणाऱ्या शिक्षकाच्या मोटारसायकलला चारचाकीने धडक दिल्याने शिक्षक जागीच ठार होऊन पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना २१ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाकरखेडा आयटीआय जवळ घडली.
टाकरखेडा येथील शिक्षक गोकुळ मुरलीधर पाटील यांच्या पत्नी संगीता या आशासेविका असून, आज त्यांनी गावात कोविड लसीकरण केल्यानंतर त्या आपल्या पतीसोबत मोटारसायकल (एमएच१९/डीएम९३७४) वर शेतात जाण्यासाठी निघाल्या होत्या. गावाबाहेर असलेल्या राजमाता जिजाऊ आयटीआयसमोर अमळनेरकडून येणाऱ्या चारचाकी (एमएच १२/ईएम २०४९)ने जोरात धडक दिल्याने मोटारसायकल खाली पडून दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन गोकुळ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडताच त्यांचा पुतण्या लक्ष्मण रमेश पाटील व गावकरी तेथे पोहोचले. त्यांनी संगीता पाटील यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, तर गोकुळ पाटील यांचे शव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. लक्ष्मण पाटील यांच्या फिर्यादीवरून चारचाकीच्या चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
मरेपर्यंत न्याय मिळाला नाही
गोकुळ पाटील हे टाकरखेडा येथील माध्यमिक विद्यालयात १९९१ पासून शिक्षक होते. शासनाच्या चुकीमुळे मान्यता यादीत टाकरखेडाऐवजी साकरखेडा झाले होते. ासाकरखेडा नावाचे गाव महाराष्ट्रात कुठेच नव्हते तरी निव्वळ ‘टा’चा ‘सा’ झाला म्हणून या शाळेचे कर्मचारी २९ वर्षांपासून विनावेतन काम करीत होते. दरम्यानच्या काळात यापूर्वी तीन शिक्षकांचेही निधन झाले आहे. कधीतरी न्याय मिळेल अन् निवृत्त होता होता वेतन मिळेल या अपेक्षेने न्यायाच्या प्रतीक्षेत गोकुळ पाटील यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, असा परिवार आहे.