दहावीच्या विद्यार्थ्याने बनविली बॅटरीवर धावणारी चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:11+5:302021-07-10T04:12:11+5:30
शेमळदे, ता. मुक्ताईनगर : येथील १६ वर्षाच्या अर्चन चिंतामण पाटील या मुलाने बॅटरीच्या सहाय्याने धावणारी चारचाकी गाडी बनवली आहे. ...
शेमळदे, ता. मुक्ताईनगर : येथील १६ वर्षाच्या अर्चन चिंतामण पाटील या मुलाने बॅटरीच्या सहाय्याने धावणारी चारचाकी गाडी बनवली आहे. विशेष म्हणजे ही गाडी पेट्रोलशिवाय चालणारी आहे.
अर्चन पाटील हा मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा विद्यार्थी असून लॉकडाऊनच्या काळात त्याने घरीच ही गाडी तयार केली आहे.
अशी तयार केली गाडी ...
लहानपणापासून त्याला विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याची आवड आहे. त्याने मोबाईलवर व्हॉईस कमांड देऊन एक रोबोट सुद्धा तयार केला होता. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घाटे विद्यालयात त्याने रोबोट तयार केला होता, त्यात त्याचा प्रथम क्रमांक सुद्धा आला होता. आता ही चारचाकी त्याने सायकल विचारात घेत तयार केली आहे. गाडीला सायकलचीच चाके वापरली असून या गाडीसाठी २४ व्होल्टची एक बॅटरी, ३५ अँपिअर व ४५ अँपिअरची त्याने वापरलेली आहे. ही बॅटरी साधारणतः ट्रॅक्टर किंवा कारमध्ये वापरली जाते. बॅटरी जोडणीचे नॉलेज त्याने घरच्या घरी यु ट्यूब वरून घेतले. सायकलचे ब्रेक तसेच मोटरसायकलचे एक्सलेटर वापरण्यात आले आहे. तसेच ही गाडी गिअरच्या सहाय्याने पुढे व मागे करता येते. ताशी वीस किलोमीटर प्रति तास असा गाडीचा वेग आहे. अतिशय कमी खर्चामध्ये त्याने ही गाडी तयार केली आहे. त्यासाठी त्याला ३० हजार इतका खर्च आला आहे.
सोलर पॉवर कार तयार करणार
अर्चनला आता सोलर पॉवर कार तयार करायची असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे . सोलर पॉवर कार तयार करण्यासाठी त्याने रिक्षाचे काही स्पेअर पार्ट तसेच डिफ्रेशन आणि कंट्रोलर याच्या सहाय्याने ही चारचाकी तयार करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी १२ व्होल्टच्या ४ बॅटरी तो त्यामध्ये वापरणार आहे तसेच मारुती कारची चार चाके उपयोगात आणणार आहे. याचबरोबर दोन सोलर प्लेट ५० वॅटच्या लागणार आहे. यासाठी अंदाजे खर्च ५० ते ६० हजार रुपये लागणार असून त्यासाठी त्याचे वडील त्याला सर्वतोपरी मदत करीत आहे. सोलर पॉवर कारही चार क्विंटलपर्यंत वजन वाहून नेऊ शकणार आहे. एकदा बॅटरी चार्ज केली की ही गाडी वेगाने जाऊ शकते.
लहानपणापासूनच गाडी बनवण्याची आवड असलेल्या अर्चनचे वडील ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य सेवक ते आहेत. एका लहानशा गावातील जवळपास साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या शेमळदे गावातील हा मुलगा दररोज शिक्षणासाठी मुक्ताईनगर येथे ये जा करीत असतो. सध्या शाळा बंद आहेत. या काळातही तो विविध प्रयोग करीत आहे. सॉफ्टवेअर ऑटोमोबाईल इंजिनिअर होण्याचे त्याचे स्वप्न असून पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जायचे आहे. आपल्या देशासाठी काहीतरी आविष्कार करण्याची त्याची इच्छा आहे .सध्या सोशल मीडियावर त्याने बनवलेली कार खूप व्हायरल होत आहे. आज या महागाईच्या काळात पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे एक लहानग्या चिमुकल्याचा हा आविष्कार खूप महत्त्वाचा मानला जात आहे.