वनपालासह वनरक्षकास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:41 PM2019-05-21T12:41:13+5:302019-05-21T12:41:40+5:30
पाच हजार रूपयांची घेतली होती लाच
जळगाव : सागवान लाकूड जास्तीचे असल्याचे सांगून पाच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या चाळीसगाव येथील वनपाल रघुनाथ रामदास देवरे व वनरक्षक विठ्ठल भास्कर पाटील (रा़ बहाळ, ता़ चाळीसगाव) यांना चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश पी़वाय़लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला़
बहाळ येथील योगेश वाल्मीक सुतार यांचे फर्निचरचे दुकान आहे़ २१ जुलै २०१५ रोजी तक्रारदार त्यांच्या दुकानात जुवार्डी वनबीटचे हवलदार रघुनाथ रामदास देवरे हे आले व त्यांनी दुकानातील सागवान लाकडे पाहून लाकूड खरेदीच्या पावत्या मागितल्या़ जास्तीचे सागवान लाकूड आढळून आल्यामुळे पाच हजार रूपये द्यावे अन्यथा केस करण्याची धमकी दिली. याबाबत सुतार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली़
२८ जुलै २०१५ रोजी चाळीसगाव येथील कार्यालयात वनपाल देवरे व वनरक्षक पाटील यांना पाच हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पथकाने पकडले़