लक्षणे नसलेले १४ रुग्ण इकराला हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:17+5:302021-01-15T04:14:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जागेची अडचण नको म्हणून लक्षणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जागेची अडचण नको म्हणून लक्षणे नसलेली १४ रुग्ण गुरूवारी इकरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हेल्थ सेंटरला पाठविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे नियोजन सुरू होते.
महापालिकेचे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. मात्र, आता कोविडची क्षमता कमी असल्याने अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास काय असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अखेर हे रुग्ण इकराच्या कोविड सेंटरला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या केंद्रात ४० रुग्ण ठेवण्याची क्षमता आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हलविण्यासाठी एका वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. वसीम शेख, खुशाल सपकाळे हे कर्मचारी रुग्णांना ने-आण करणे, जेवण पोचविण्याचे कार्य करीत आहे. यासह ५ सफाई कामगार जिल्हा रुग्णालयातर्फे केंद्रात नियुक्त केले असून नियमित औषधांचा पुरवठा देखील जीएमसीद्वारे केला जात आहे. समन्वयक म्हणून उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.