दीड वर्षात पूर्ण होणार जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:48 PM2018-11-05T22:48:54+5:302018-11-05T22:50:21+5:30
जळगाव ते चाळीसगाव दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी ४४७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
जळगाव/पाचोरा- जळगाव ते चाळीसगाव दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी ४४७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव ते हिंगोणे व दुसऱ्या टप्प्यात हिंगोणे ते खडकी असे हे काम होणार आहे. अशोका बिल्डकॉमला हे काम देण्यात आले आहे. काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
जळगाव ते चांदवड असे हे काँक्रीटचे चौपदरीकरण होत आहे. हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ७६३ जे मध्ये रुपांतरीत करण्यात आला आहे. हा रस्ता चौपदरीकरण करताना रस्त्यात काही गावांमधील घरे, मंदिरे अडचणीची ठरणार आहे. यासाठी नागरिकांंशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने स्वत: खासदार ए.टी. पाटील यांनी जळगाव ते रामदेववाडीपर्यंतच्या मार्गाची पाहणी केली तसेच नागरिकांशीही चर्चा केली. रामदेववाडी जवळ रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचीही काहीजागा ताब्यात घ्यावी लागणार आहे.
१६ मंदिरांची पुनर्स्थापना, पुरातन मंदिराचीही अडचण
रस्ता चौपदरीकरण करताना सुमारे १६ मंदिरांची पुनर्स्थापना करावी लागणार आहे. याचबरोबर पातोंडा जवळील पुरातत्व विभाग अंतर्गत येणारे मुदई देवीच्या मंदिराचीही भिंत येत असून या पाहणीसाठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे अधिकारीही सोबत होते.यावर देखील योग्य तो मार्ग काढला जाणार आहे.
अनेक पूल, भुयारी मार्ग आणि दोन टोलनाके
रस्त्यावर हिंगोणे येथे एक तर हडसन येथे एक असे दोन टोलनाके राहणार आहेत. गावांमधून रस्ता जात असल्याने वाढती वाहतूक लक्षात घेता अशा ठिकणी भुयारी मार्गही केले जाणार आहेत. १ मोठा पूल, १५ लहान पूल, काही मोºया, ३ जोड रस्ते अशी कामे होणार असून आवश्यकता भासल्यास नवीन डीपीआरही पाठविला जाणार आहे.