लग्न जोडून देण्याच्या नावाखाली फसवणूक, बंटी-बबली व वधूविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 08:05 PM2020-12-21T20:05:02+5:302020-12-21T20:06:01+5:30
फसवणूक करणाऱ्या बंटी-बबली व उपवधू अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर : लग्न होण्यास अडचणी येणार्या उपवरांना हेरून त्यांना लग्न सोडून देतो, सांगत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबली व उपवधू अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पाडळसा येथील २९ वर्षीय तरुण प्रमोद भागवत तेली याची दीड लाखात फसवणूक झाली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या बंटी-बबली अर्थात अशोक कडू चौधरी ( कुंभारखेडा ता रावेर), रेश्मा रफिक खान (मीना, शाहनगर नगर औरंगाबाद) व रूपाली अशी तिघांची नावे आहे. प्रमोद याचा विवाह ३१ ऑक्टोबर रोजी पाडळसा येथे रूपाली नामक तरुणीशी झाला होता. हा विवाह अशोक चौधरी व रेश्मा रफिक खान यांनी दीड लाख रुपये घेऊन घडवून आणलेला होता. लग्नानंतर चार-पाच दिवसांनी दि.६ रोजी वधूची कथित मावस बहीण रेश्मा उर्फ मीना हिने रूपालीच्या आईची तब्येत बरी नसून तिला आईला भेटण्यासाठी घेऊन जाते, असे सांगून गेल्यानंतर रूपाली ही परत आलीच नाही. तिघांशी संपर्क साधला, पण ते मिळून आले नाही.
त्यातच अशोक चौधरी यांच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात अशाच फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल असून तो अटक असल्याचे समजले. त्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी लग्न लावून देतो, म्हणून दीड लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी अशोक कडू चौधरी, रेश्मा रफी खान व रूपाली (खरे नाव माहित नाही) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे व हेडकॉन्स्टेबल सुधाकर पाटील करीत आहे.
चाळीसगाव व धरणगावातही गुन्हे दाखल
अशोक चौधरी व त्याच्या साथीदार महिलांविरुद्ध लग्न लावून देण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव तसेच धरणगाव येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी दिली.