ट्रान्सपोर्टच्या नावाने वकिलाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:13+5:302021-06-16T04:24:13+5:30
जळगाव : गुजरात येथून बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी ट्रकचे भाडे निश्चित केल्यानंतर साहित्य आणण्यास नकार देत भाड्यापोटी ऑनलाईन पाठविलेले २० ...
जळगाव : गुजरात येथून बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी ट्रकचे भाडे निश्चित केल्यानंतर साहित्य आणण्यास नकार देत भाड्यापोटी ऑनलाईन पाठविलेले २० हजार रुपये परत न केल्याने गोरेक्स फ्रेज प्रा.लि.या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाने मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड.केदार किशोर भुसारी (४५,रा.बळीराम पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
ॲड.भुसारी यांच्या शिवाजी नगरात सुरु असलेल्या बांधकामासाठी मोरबी, गुजरात येथून टाईल्स व सॅनिटरी बुक केले होते. जस्ट डायल पोर्टलच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला होता. त्यानंतर एका मोबाईलधारकाने ॲड.भुसारी यांच्याशी संपर्क साधून ट्रकचे २० हजार रुपये भाडे सांगितले होते. ॲड.भुसारी यांनी स्वत: तसेच मित्र लोकेश भगत यांच्या खात्यातून प्रत्येकी १० हजार या प्रमाणे २० हजार रुपये ऑनलाईन बँक खात्यात भरले. ४ ते ७ जून दरम्यान हा प्रकार घडला; मात्र पैसेही मिळाले नाहीत व ट्रकही आला नाही म्हणून ॲड.भुसारी यांनी फसवणुकीची तक्रार दिली. तपास सहायक फौजदार उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.