शाळांमध्ये रोबोटिक लॅब सुरु करण्याच्या नावाखाली दहा लाखांत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:28 PM2020-12-17T20:28:53+5:302020-12-17T20:29:03+5:30
गुन्हा दाखल : अस्तित्वात नसलेल्या सातपुडा इन्फोटेक कंपनीचा वापर
जळगाव : जिल्ह्यातील शाळांसाठी रोबोटीक लॅब उभारणीच्या प्रकल्पात गुंतवणुकीचे आमीष देत दहा लाखांत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अस्तितत्वात नसलेल्या सातपुडा इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीच्या नावाने फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी कंपनी रितेश देवराम पाटील (रा.जिल्हा पेठ), वैशाली पाटील (रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी), शितल योगेश पाटील (रा.पुणे, ह.मु.जळगाव) किर्ती रितेश पाटील (रा. जिल्हा पेठ), सिमंतनी सुभाष पाटील (रा.राधाकृष्ण नगर) व ज्योती संतोष सोनवणे (रा.छत्रपती कॉलनी, जिल्हा पेठ) यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
रामानंदनगर परिसरातील किसनराव नगर येथील अभिषेक जगन्नाथ निंभोरे यांनी फिर्याद दिली आहे. वैशाली पाटील हिने अभिषेक निंभोरे यांच्या आई ज्योती निंभोरे यांच्याशी परिचय वाढवून मागासवर्गीय समुदायासाठी काम करणाऱ्या सातपुडा इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीत गुंतवणुकीचा विषय मांडला. नंतर सातपुडा इन्फोटेक प्रा.लि.च्या कार्यालयात रितेश पाटील यांच्याशी ओळख करुन दिल्यावर त्यांनी कंपनीच्या रोबोटीक लॅब बाबत माहिती सांगीतली. जिल्ह्यातील बाराशे शाळांसाठी अशा लॅब उभारण्याची फ्रान्चायझी आम्हाला द्यायची असल्याचे सांगत दहा व पंचवीस लाख गुंतवणुकीचा प्लॅन मांडला. एका फ्रन्चायझीसाठी दहा लाख गुंतवणुक केल्यावर प्रतिमहा ३५ हजार रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच तालूका फ्रन्चायझी साठी पंचवीस लाख गुंतवणुक केल्यावर महिन्याला दोन लाखांवर उत्पन्न मिळणार असल्याचे रितेश पाटील याने समजावून सांगितले. पाटील याने पैसे गुंतवा लगेच कर्ज मंजुर होताच तुमचा पैसा परत मिळवा महिन्याला उत्पन्न सुरुच अशा भुलथापा देत अभिषेक निंभोरे यांच्याकडून २६ डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदाचा दहा लाख रुपयांचा धनादेश घेतला. तो लगेच ४ जानेवारीला निभोंरे यांच्या खात्यातून पैसे वर्ग झाल्यावर रितेश पाटील याच्याशी स्टॅपवरील करार आणि रिसीटची मागणी केली असता त्याने तेव्हा टाळून लावले. फ्रान्चायझी न मिळाल्याने रितेश आणि वैशाली यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावल्यावर त्यांच्याकडून टाळाटाळ झाली. खासगी लेखा परिक्षकाकडून कंपनी बाबत चौकशी केली असता, ही कंपनी केव्हाच बंद झाली असून संचालक म्हणून शितल योगेश पाटील, किर्ती रितेश पाटील, चित्रा ब्रिजेश पाटील, सिमंतनी सुभाष कुळकर्णी,ज्योती संतोष सोनवणे अशांची नावे आढळून आल्याने फसवणुक झाल्याचे स्पष्ट झाल्याने निभांरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सातही संशयितांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.