फसवणुकीचे बिंग फुटू नये, म्हणून केली कार चोरीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:16+5:302021-07-20T04:13:16+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या अमोल प्रदीप चौधरी (रा.वसई) या तरुणाची जानेवारी, २०२० मध्ये वैभव राणे (अंकित) नामक ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या अमोल प्रदीप चौधरी (रा.वसई) या तरुणाची जानेवारी, २०२० मध्ये वैभव राणे (अंकित) नामक नावाच्या व्यक्तीशी नाशिक येथे भेट झाली. एका सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. डिस्ट्रिक्ट ऑडिटर म्हणून पुण्यात काम करीत असल्याचे राणे याने सांगितले, त्याशिवाय लेवा पाटील समाजाचेही कार्य करीत असल्याचे सांगितले, तसेच राणे याने स्टेट बँकेत ऑपरेशन शाखा व्यवस्थापक या पदावर तुझे काम करून देतो, असे आमिष अमोलला दाखविले. लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्याने अमोल यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५ जून, २०२० ते २३ जानेवारी, २०२१ या कालावधीत नोकरीची प्रोसेस करण्याच्या नावाखाली त्याने अमोल यांच्याकडून ४ लाख ६८ हजार रुपये घेतले. कोरोनामुळे सहा महिने काम लांबणीवर पडल्याचे सांगून काही दिवस लांबविले. त्यानंतर, ९ ते १६ जुलै, २०२१ या कालावधीत पुन्हा २१ हजार रुपये ऑनलाइन घेतले.
नाशिकहून सोबत आणले अन् कार चोरीची तक्रार दिली
नोकरीचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी अमोलने राणे याच्याशी १२ जुलै रोजी संपर्क केला असता, तुमचे काम झाले आहे, तुम्ही १६ जुलै रोजी नाशिकला या, आपण येथून १७ रोजी नोकरीच्या प्रोसेसकामी जळगावाला जाऊ, असे सांगून अमोल यांना नाशिकला बोलावले. तेथून राणे याच्या कारने (क्र.एम.एच.१५ जी.एक्स ६५९९) पहाटे पाच वाजता जळगावसाठी निघाले. सकाळी साडेनऊ वाजता एका हॉटेलजवळ आले. तेथे मी तुझ्या कामाची प्रोसेस करण्यासाठी जातो, तू इथेच थांब व माझी कार तुझ्याजवळच राहू दे, असे सांगून राणे हा तेथून निघाला. थोड्याच वेळात अमोल यांना रामानंद नगर पोलीस ठाण्यातून फोन आला, तुम्ही कार चोरली आहे का, तुमच्याविरुद्ध तक्रार आली असून, तक्रारदार पोलीस ठाण्यात आहे, असे सांगितल्याने अमोल यांनी पोलीस ठाणे गाठले असता, तेथे राणे व एक मुलगी आधीच आलेली होती. पोलिसांना खरा प्रकार सांगितला असता, त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात राणेचे खरे नाव अंकित गोवर्धन भालेराव व जी मुलगी होती, तिचे नाव स्वाती गोवर्धन भालेराव असे होते. दोघं भाऊ-बहीण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, ऑनलाइन पैसे ज्या व्यक्तीच्या मोबाइलवर मागविले होते, ती व्यक्ती अंकितची आई रत्नमाला असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभराच्या चौकशीअंती सोमवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आई, मुलगा व बहीण तिघे कोठडीत
अंकित उर्फ राणे याने अमोल चौधरीसह हेमंत सुभाष भंगाळे (वय ३३,रा.नेहरूनगर) या तरुणाला ४ लाख, पूर्वा ललित पोतदार (वय ३२, रा.पुणे) यांना ७ लाख ३० हजार, देवेंद्र सुरेश भारंबे (वय ३६, रा.भुसावळ) यांना २ लाख ४० हजार तर बांधकाम व्यावसायिक नितीन प्रभाकर सपके (वय ४५, रा.आनंदनगर, जळगाव) यांना १२ लाख ६० हजार रुपयात फसविल्याचेही निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी आई, मुलगा व मुलगी अशा तिघांना अटक करून, सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.