भुसावळ तालुक्यात उधारीच्या वादातून बनावट डिझेल विक्रीचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:52 PM2019-02-10T22:52:35+5:302019-02-10T22:59:02+5:30
शासनाचा कोणताही परवाना न घेता, बनावट डिझेल विक्री करणाऱ्या संदेश एनर्जीस फॅक्टरीचा भंडाफोड उधारीच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे.
उत्तम काळे ।
भुसावळ : शासनाचा कोणताही परवाना न घेता, बनावट डिझेल विक्री करणाऱ्या संदेश एनर्जीस फॅक्टरीचा भंडाफोड उधारीच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे.
८ रोजी पोलिसांनी एक वाहन अडवले होते, त्यातून ३६० लीटर डिझेल नेण्यात येत होते. या डिझेलचा पोलिसांनी मागोवा घेतला असता संदेश फॅक्टरीतून ते आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या फॅक्टरीपर्यंत पोलीस पोहोचले आणि एकेक माहिती समोर येत आहे.
तालुक्यातील कुºहे (पानाचे)-गोजोरे दरम्यान संदेश फॅक्टरी प्रकरणाप्रमाणे या परिसरात अनेक गोडावून व फॅक्टरी सुरू आहे. मात्र यांची तपासणी होते किंवा नाही, का? संबंधित अधिकाºयांच्या छुप्या आशिर्वादाने बनावट व बायोडिझेल प्रकरणाप्रमाणे इतर काही बेकायदेशीर उद्योग या फॅक्टरी व गोडाऊनमध्ये सुरू आहे का, असे अनेक प्रश्न या बायोडीजल प्रकरणामुळे उपस्थित झाले आहेत. दरम्यान, तपासणी होत असेल तर हा प्रकार याआधी का उघडकीस आला नाही. यातूनच इतरही गोदामे व फॅक्टरींची तपासणी करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. अशा अवैध प्रकारातून जीवितास धोका तर निर्माण होऊ शकणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संदेश फॅक्टरीतील ही बायोडिझेल विक्री भुसावळ, जळगाव येथील अनेक खासगी बसमालकांना होत होती. येथे मुंबई येथून हजारो लीटर हे चोरीचे इंधन येत होते. त्यामुळे हे डिझेल अतिशय कमी किंमतमध्ये विकण्यात येत होते, असे खासगीत सांगण्यात येत आहे.
संदेश फॅक्टरीमध्ये हा कारखाना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. येथे बायोडिझेल तयार करण्यासाठी खराब रबर व प्लॅस्टिकचा सर्रास वापर करण्यात येऊन त्यात केमिकल टाकून फॅक्टरीचे एका जागेत बायोडिझेल तयार करण्यासाठी यंत्र बसविण्यात आले आहे, तर दररोज एक हजार लीटर डिझेल तयार होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर या ठिकाणी मुंबई येथून चोरीचे डिझेलही येत होते, असे खासगीत सांगण्यात आले. हे डिझेल केवळ २५ रुपये लीटरप्रमाणे मिळत होते. या डिझेलचे बायोडिझेलमध्ये मिश्रण करून विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
परिसरात प्रदूषण होऊनही संबंधित अधिकारी गप्प का?
दरम्यान, या फॅक्टरीमध्ये खराब प्लॅस्टिक जाळण्यात येत होते. त्यामुळे परिसरात तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत प्रदूषण होत होते. तर याचा पिकावरही परिणाम होत होता. तरीही प्रदूषण, महसूल व पोलीस प्रशासन गप्प का होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या परिसरात जिलेटिन स्फोटक यासह अनेक लहान-मोठे उद्योग आहे. त्यांचीही तपासणी होते किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संदेश फॅक्टरीतून जळगाव येथे खासगी बसचालकांना हे डिझेल विक्री होत होती. हा व्यवहार मोजक्याच ग्राहकांसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू होता. त्यामुळे एका खासगी मालकाकडे तब्बल सहा लाख रुपये थकले होते. त्यामुळे त्याची नाराजी निर्माण झाली होती. त्यांच्याकडून पोलिसांना ही माहिती देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांना मिळालेल्या माहितीवरून गाडी अडवण्यात आली व हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात आले.
अधिकारी म्हणतात.... डीवायएसपी गजानन राठोड यांच्याशी संपर्क साधला असता खासगी लहान-मोठे उद्योग तपासण्याचे अधिकार पोलिसांना नाही. मात्र कुणाची तक्रार असल्यास कारखान्यांची तपासणी आम्ही करतो, अशी माहिती त्यांनी दिली, तर तशीच माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.
लहान-मोठ्या उद्योगांच्या तपासणी करण्यासंदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे तक्रारी आल्यास आम्ही तपासणी करतो. मात्र यासंदर्भात नियमित तपासणी करण्याचे काम एमआयडीसी अधिकाºयांचे असल्याचे त्यांनी सांगितले