२९ रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 03:53 PM2018-08-02T15:53:04+5:302018-08-02T15:56:38+5:30
चाळीसगाव येथे आई ट्रस्टच्या उपक्रमात २४३ रुग्णांची नेत्रतपासणी
चाळीसगाव, जि.जळगाव : आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आई फाऊंडेशन व शारदा नेत्रालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी घेण्यात आलेल्या एकदिवसीय मोफत नेत्रतपासणी शिबिरातील २९ गरजू रुग्णांवर शारदा नेत्रालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. २४३ रुग्णांची नेत्रतपासणी झाली. मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांसह नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
शिबिराचे उदघाटन कर सल्लागार शशिकांत धामणे, कल्पना धामणे, निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर कोतकर, कमल कोतकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
आई फाऊंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद असून, आजच्या नेत्रतपासणी शिबिरातून अनेक गरजू रूग्णांचा फायदा होणार असल्याचे शशिकांत धामणे यांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक रूग्ण मोतिबिंदूची शस्रक्रीया करीत नाहीत. त्यामुळेच आई चॅरिटेबल ट्रस्टने या गरजू रुग्णांसाठी मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियान सुरू केल्याचे आई फाऊंडेशनचे अध्यक्ष व चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचीव डॉ.विनोद कोतकर यांनी यावेळी विशद केले.
यापुढे दर महिन्याच्या एक तारखेला आई हॉस्पिटलमध्ये नेत्रतपासणी शिबिराचेआयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ.विनोद कोतकर यांनी जाहीर केले. यशस्वितेसाठी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.चेतना कोतकर यांनी सहकार्य केले.