गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मोफत सीईटी अर्ज सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:58+5:302021-06-25T04:12:58+5:30
भुसावळ : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ...
भुसावळ : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी ८ जून ते ७ जुलैपर्यंत तर विलंब शुल्कासह ८ ते १५ जुलै असा कालावधी दिला आहे.
विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परीक्षेेचे अर्ज भरण्यात बऱ्याच वेळा चुका होतात, धावपळ होते. या दृष्टीने श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत भाग घेताना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जात पडताळणी, नॉन क्रिमिलेयर दाखले वेळेत सादर न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि पालकांचे आर्थिक नुकसान होते. विद्यार्थी व पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात "विद्यार्थी मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एक फोटो ओळखपत्र, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांनिशी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.राहुल बारजिभे यांनी केले आहे.