प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबांना होणार अर्सेनिक अल्बम-३० औषधाचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:59 PM2020-05-20T20:59:59+5:302020-05-20T21:00:16+5:30
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला असून दिवसेदिवस नवीन रुग्णाची त्यामध्ये भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम -३० ...
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला असून दिवसेदिवस नवीन रुग्णाची त्यामध्ये भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम -३० या औषधामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबाना मोफत अर्सेनिक अल्बम -३० या औषधांचा पुरवठा स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे. या औषधांचे वाटप करणे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आदी कामे स्वयंसेवकांमार्फत पुढील कालावधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
यावेळी निवड करण्यात येणाऱ्या स्वयंसेवक हा प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी असणार आहे़ तर तो स्वयंसेवक हा स्वयंस्फुतीर्ने काम करण्यास तयार असावा, त्याचे वय सर्वसाधारणपणे २५ ते ४० वर्षे या वयोगटातील असावा. त्याला कोणताही आजार नसावा, अशांची निवड केली जाणार आहे़ त्यातच सर्वसधारणपणे ५० कुटूंबासाठी एक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. कुटूंबाची यादी तयार करतांना सलग घरे असलेली कुटूंब घेण्यात येणार आहे. या कुटूंबाशी परिचीत असलेली व्यक्तीच स्वयंसेवक म्हणून घेण्यात येणार आहे.
अर्सेनिक अल्बम -३० या औषधाचे जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसिलदार यांना ५०-५० डब्यांचे बंडल करुन दिले जाणार आहे़ तहसिलदार हे त्याचदिवशी सदरची औषधे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबांची संख्या विचारात घेवून प्रतिबंधित क्षेत्र अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करतील़ नंतर तो अधिकारी े प्रत्येक स्वयंसेवकास ५० बॉटल्स देतील. स्वयंसेवक त्यांचेकडे असलेल्या 50 कुटूंबियांना वाटप करतील. स्वयंसेवकांनी औषधांचे वाटप सुरु करण्यापुर्वी सॅनिटायझर ने हात स्वच्छ धुवायचे असुन मास्क घातल्याशिवाय कोणीही औषधांचे वाटप करावयाचे नाही, औषध वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची दक्षता स्वयंसेवकांनी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत़