मंत्र्यांना मोकळीक, शिवजयंतीला बंधने का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:33+5:302021-02-20T04:44:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यभरात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग वाढण्यास राज्य शासनाने केलेल्या चुका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यभरात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग वाढण्यास राज्य शासनाने केलेल्या चुका कारणीभूत आहेत. राज्यातील मंत्रीच नियमांची पायमल्ली करीत आहेत मग शिवजयंतीलाच नियम का? अशा शब्दात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासनावर टीका केली आहे.
शुक्रवारी जिल्हा भाजपकडून जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम संपल्यानंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा महाननगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थिती होते.
राज्य शासनाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात घातलेल्या निर्बंधांवर महाजनांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या सावटाखाली शिवजयंती साजरी होत आहे. एकीकडे राज्य शासनाचे मंत्री, प्रमुख नियमांची पायमल्ली करत आहेत. दररोज मंत्री मोठ्या रॅली काढत आहेत, हजारोंच्या संख्येने मेळावे घेत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र, शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर निर्बंध हा दुतोंडीपणा आहे. तुम्ही आपल्या लोकांना आवर घालू शकत नाहीत, मग लोकांवर निर्बंध का? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला. सर्वांना नियम लागू झाले पाहिजेत. आपल्या जाणत्या राजाची जयंती आहे म्हणून आम्ही नियमांच्या चौकटीत हा उत्सव साजरा करू, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.