ममुराबादला रेशनवर मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:13+5:302021-04-20T04:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : शासनाने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या कमी उत्पन्न गटातील नागरिकांना नियमित रेशनसोबत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : शासनाने कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या कमी उत्पन्न गटातील नागरिकांना नियमित रेशनसोबत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू तसेच २ किलो तांदूळ मोफत देण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात गावातील कोणत्याच रेशन दुकानावर अजूनही मोफत शिधा पोहोचला नसून नियमित विकत धान्य तेवढे वाटप होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ममुराबाद गावात दारिद्र्यरेषेखालील अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या कार्डधारकांची संख्या सुमारे दीड हजारावर असून, त्यांच्यासाठी तीन रेशन दुकानांची सोयदेखील करण्यात आली आहे. संबंधित सर्व दुकानदारांनी शासनाच्या नियमानुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना प्रतिमाह प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू सवलतीच्या दरात विकत देणे बंधनकारक आहे. याशिवाय साधारण एका महिन्यासाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्याचे नवीन आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. मात्र, संबंधित दुकानांवर चौकशीसाठी गेल्यानंतर फक्त नियमित धान्याचे तेवढे वाटप सध्या होत असून, मोफत गहू व तांदळासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थींची घोर निराशा होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्यानंतर अनेकांच्या हाताला काही दिवसांपासून काम राहिलेले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना आर्थिक ओढाताण त्यांना सहन करावी लागत आहे. अशा परिस्थितीत मोफत धान्याचे वाटप वेळेवर झाले असते तर त्यांना मोठा आधार मिळणार होता. आता उशिराने मोफत गहू आणि तांदूळ मिळाला तरी त्यासाठी सर्वांना कामधंदा सोडून पुन्हा रांगेत उभे राहावे लागणार आहे.
-------------------------
शासनाने कोरोनाची साथ रोखण्यासाठी संचारबंदी घोषित केल्यापासून रोजगाराचे कोणतेही साधन राहिलेले नाही. रेशनवर मोफत गहू, तांदूळ मिळाल्यानंतर थोडाफार आधार मिळू शकेल.
- निंबा पाटील, ममुराबाद