म्युकरमायकोसिसनंतरच्या दुष्परिणामांवरही मोफत उपचार मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:43+5:302021-06-03T04:12:43+5:30
जळगाव : राज्यात म्युकरमायकोसिसचा उद्रेक मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच होऊनही राज्य सरकारने मे महिन्यात या आजाराविषयी माहिती देत या ...
जळगाव : राज्यात म्युकरमायकोसिसचा उद्रेक मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच होऊनही राज्य सरकारने मे महिन्यात या आजाराविषयी माहिती देत या आजारावरील औषधोपचार आणि शस्त्रक्रिया महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत होतील, असे जाहीर केले. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक जण उपचार घेत असून त्यांनाही उपचाराचा खर्च मिळावा, अशी मागणी भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची दिली प्रत
म्युकरमायकोसिसचा संसर्ग मार्च महिन्यातच उद्भवल्याचे वृत्त लोकमतने दोन महिन्यांपूर्वीच प्रकाशित केले होते. ही बाब नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी समोर आणल्यानंतर या विषयी सविस्तर माहिती ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. या वृत्ताची प्रतही या वेळी देवेंद्र फडणवीस यांना निवेदनासोबत देण्यात आली.
जनतेच्या हिताचा विचार करावा
म्युकरमायकोसिसमुळे अनेकांना मोठा खर्च येत असून त्यानंतरच्या परिणामांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करीत यासाठी मोफत उपचाराविषयी मागण्या करण्यात आल्या. यात म्युकरमायकोसिसमुळे काही रुग्णांना जबडा, दात, डोळा किंवा इतर अवयव गमवावा लागला आहे, अशा रुग्णांना भविष्यात आवश्यक असलेल्या रिकंन्स्ट्रकशन सर्जरी, प्रोस्थेसिस यासारखे उपचारदेखील महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत मिळावे, आवश्यक सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत शासन मान्य असलेल्या प्रत्येक रुग्णालयात देखील मोफत व्हावे, लायपोझोमल अँमफोटेरेसिन बी हे इंजेक्शन खासगी रुग्णालयांनादेखील पुरेसे उपलब्ध व्हावे, तीव्रतेनुसार आवश्यक असलेला इंजेक्शन लापोझोमल अँफोटेरेसिन बीचा डोस राज्य टास्क फोर्सद्वारा निश्चित करण्यात यावा, म्युकरमायकोसिस आजारामुळे अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांना विमा कवच मिळावे, या आजाराने अशासकीय कर्मचारी, मजूर, शेतकरी कुटुंबातील रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला राज्यशासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या.