एकदम मस्त; पाच लाखाच्या विम्यासह उपचारही फ्री!

By अमित महाबळ | Published: September 16, 2023 03:32 PM2023-09-16T15:32:06+5:302023-09-16T15:32:34+5:30

जि.प.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

free treatment with insurance of five lakhs | एकदम मस्त; पाच लाखाच्या विम्यासह उपचारही फ्री!

एकदम मस्त; पाच लाखाच्या विम्यासह उपचारही फ्री!

googlenewsNext

अमित महाबळ, जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. या कार्डमुळे लाभार्थींना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली. ते शनिवारी, जि.प.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आयुष्मान भव मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत आहे. यामध्ये आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा आणि अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी होणार आहे. आयुष्यमान भारतचे २१, ८४, ८३९ कार्ड देण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ४, ९१, ६७४ कार्ड काढण्यात आले आहेत. आभा कार्डसाठी ४२, २९, ००० उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२, २०, ००० कार्ड काढून झाले आहेत. हे कार्ड काढून देण्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी येणार आहेत. लाभार्थींनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अंकित यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. आकाश चौधरी आदी उपस्थित होते.

मोहिमेत हेही कार्यक्रम

- मोहिमेत रक्तदान व अवयवदान शिबिर, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगनिदान, तसेच कान, नाक, घसा व नेत्र तपासणी होईल. २ ऑक्टोबर रोजी, गावांमध्ये आयुष्मान सभांचे होतील.
- गरोदर मातांसह शून्य ते १८ वयोगटातील ९,८८,१६३ बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकता असलेल्या बालकांवर उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डेंग्यूवर वेळीच उपचार करा

तालुक्यातील शिरसोली येथे डेंग्यूसदृश्य आजारामुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय पथकाने गावात तपासणी केली असता, ६६ घरे आणि ९५ कंटेनरमध्ये डासअळी आढळून आली. ६ रुग्णांना ताप होता. अतितीव्र ताप असलेल्या ५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. डेंग्यूमध्ये वेळीच उपचार घेतल्यास पुढील धोके टळतील, असे आवाहन अंकित यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत कार्ड असे मिळवा

पात्रता : आयुष्यमान भारत कार्डसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहून पात्रता निश्चित केलेली आहे. यात पक्के घर नसणे, महिला प्रमुख असलेले कुटुंब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, बीपीएल कार्ड किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंब, सरकारने राबवलेल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ न घेतलेले कुटुंब आदी निकष आहेत.

सुविधा : केंद्र सरकार लाभार्थी कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करणार आहे. यामुळे कोणताही गरीब व्यक्ती खासगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकतो.

Web Title: free treatment with insurance of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.