१९ सरकारी रुग्णालयात मोफत, तर २८ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांत लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:18 AM2021-03-01T04:18:30+5:302021-03-01T04:18:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सरकारने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता १ मार्चपासून खासगी रुग्णालयातही लसीकरणाला सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सरकारने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता १ मार्चपासून खासगी रुग्णालयातही लसीकरणाला सुरुवात आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १९ शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत, तर जिल्ह्यातील २८ खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांमध्ये लस मिळणार आहे.
केंद्र सरकारने लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता ६० वर्षे वयावरील नागरिकांनाही १ मार्चपासून लस घेता येणार आहे. यासोबत ४५ वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशांनाही लस घेता येणार आहे. लसीकरणासाठी केंद्रांची उभारणी केली जाणार असून, त्यापैकी या केंद्रांत लस मोफत दिली जाणार आहे. खासगी आरोग्य केंद्रे व रुग्णालयांत लसीसाठी शुल्क आकारले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या शासकीय लसीकरण सुरू असून, यामध्ये आरोग्य विभागानंतर आता पहिल्या फळीतील कोरोना योद्धांना लसीकरण सुरू आहे. सरकारी लसीकरणामध्ये जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महापालिकेच्या वतीने गाजरे हॉस्पिटल, गोल्डसिटी हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल यांसह जिल्ह्यातील १५ ग्रामीण रुग्णालयांमध्ये असे एकूण १९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. या १९ केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. आता खासगी रुग्णालयांचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, जिल्ह्यातील २८ खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांमध्ये लस दिली जाणार आहे.
नोंदणी कशी करावी?
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वनोंदणी पद्धत राहणार आहे. यात लाभार्थ्याला को-विन ॲप २.० डाऊनलोड करावे लागेल. या ॲपवरून लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकेल. नोंदणीसाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, वयाची खात्री झाली की मगच को-विन ॲपवर अन्य माहिती दिसू शकेल.
कोणाला मिळणार लस?
६०वर्षे वयावरील नागरिकांना लस घेता येणार आहे. ४५वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशानाही लस घेता येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील ३० टक्के लसीकरण बाकी
जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रथम आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांच्या लसीकरण्याची नोंद करण्यात आली. नंतर कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे महसूल विभाग, पोलीस व इतर विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. सध्या ७० टक्के लसीकरण झाले असून, ३० टक्के लसीकरण होणे अद्याप बाकी आहे.
येथे मिळणार कोरोना लस
- सरकारी रुग्णालये
शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालय
गाजरे हॉस्पिटल (महापालिकेचे केंद्र)
गोल्डसिटी हॉस्पिटल (महापालिकेचे केंद्र)
ऑर्किड हॉस्पिटल (महापालिकेचे केंद्र)
- खासगी रुग्णालये
जीवन ज्योती कॅन्सर हॉस्पिटल, श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, कांताई नेत्रालय, प्रकाश मुलांचे हॉस्पिटल, जावळे हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, डॉ. भंगाळे नर्सिंग होम, महाजन हॉस्पिटल (प्रतापनगर), श्री साईलीला ॲक्सिडेंट हॉस्पिटल, खडके हॉस्पिटल, सुलोचन रेटिना केअर सेंटर, गायत्री हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, भिरुड हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल श्री ॲक्सिडेंट हॉस्पिटल, श्री आशीर्वाद ॲक्सिडेंट हॉस्पिटल (सर्व जळगाव), डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव-भुसावळ रोड, कृष्णा क्रिटिकल केअर सेंटर ॲण्ड हॉस्पिटल, चाळीसगाव, बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, चाळीसगाव, विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा, जीएम हेल्थ केअर, जीएम. हॉस्पिटल, जामनेर, कमल हॉस्पिटल, जामनेर, नृसिंह हॉस्पिटल, चोपडा, विश्वनाथ हॉस्पिटल, भुसावळ, साईपुष्प हॉस्पिटल, भुसावळ, पुष्पा सर्जिकल हॉस्पिटल, भुसावळ.