मुंबईच्या नियमित विमान सेवेला शुक्रवारचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:42+5:302021-03-10T04:17:42+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यात २ मार्चपासून नियमित सुरू होणाऱ्या विमानसेवेला मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्यामुळे ही सेवा रखडली ...
जळगाव : गेल्या आठवड्यात २ मार्चपासून नियमित सुरू होणाऱ्या विमानसेवेला मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्यामुळे ही सेवा रखडली होती. मात्र, राज्य शासनातर्फे १० मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील डोमेस्टीक टर्मिनल-१ खुले करण्यात येणार असल्याने, जळगाव ते मुंबई विमानसेवा १२ मार्चपासून नियमित होणार असल्याची माहिती `ट्रू जेट` विमान कंपनीचे वितरण व्यवस्थापक नैमिश जोशी यांनी `लोकमत`ला दिली.
कोरोनामुळे राज्य शासनातर्फे मुंबईतील विमानसेवेवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. वर्षभरापासून डोमेस्टीक टर्मिनल-१ बंद असल्यामुळे टर्मिनल- २ वरून देशांतर्गंत आणि आंतराष्ट्रीय उड्डाणे होत होती. यामुळे जळगाव ते मुंबई विमानसेवाही आठवड्यातून फक्त दर रविवारीच सुरू होती. मात्र, राज्य शासनाने सेवेबाबत विमान कंपन्यांची वाढती मागणी लक्षात घेता, १० मार्च पासून टर्मिनल -१ खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव ते मुंबई विमानसेवा सर्व तयारी निशी १२ मार्चपासून नियमित सुरू राहणार आहे. दरम्यान, जळगाव ते मुंबई या विमान सेवेत नांदेड शहरही नव्याने जोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना जळगावहून नांदेडला जाणेही सोयीचे झाले आहे.