फेसबुकवर मैत्री अन् प्रेम...प्रत्यक्ष भेटूनही राहिले दोघांचे स्वप्न अधुरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:54 PM2019-11-11T12:54:47+5:302019-11-11T12:55:24+5:30
प्रेम : जळगावचा तरुण आणि कोलकाता येथील तरुणीची अधुरी एक कहाणी
जळगाव : फेसबुकवर ओळख झाली नंतर मैत्री झाली, या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.. पुढे जावून एकत्र संसार व लग्नाच्या आणाभाका घेतल्या...त्यासाठी दोघांनी घर सोडले.. प्रत्यक्ष भेट झाली... मात्र त्यांचे हे स्वप्न क्षणीक राहिले... प्रेमाची कहाणी देखील अधुरीच राहिली... तरुण जळगावला तर तरुणी कोलकाता येथे परतली.
या प्रेम कहाणीची सध्या शहरात चर्चा सुरु आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा २१ वर्षाचा सागर (काल्पनिक नाव) हा प्लंबरचे काम करतो. कापड व्यवसाय करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. दोन वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील १९ वर्षीय जयाच्या संपर्कात आला. दोघांची चांगली ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली व या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेमप्रकरण इतके बहरले की, भेटीची उत्सुकता लागली. सागर जळगाव तर जया कोलकाता येथे असल्याने सहज भेटणे शक्य नव्हते. मध्यंतरी एका उत्सवाच्यावेळी भेटीचा दिवस निश्चित केला, परंतु जयाला घरुन बाहेर निघायला कुटुंबाकडून अडचणी आल्या, त्यामुळे तेव्हा भेट होऊ शकली नाही.
अजमेरला आले दोघं एकत्र
पहिली भेट फिस्कटल्यानंतर सागर कपडे घेण्याच्या नावाखाली ५ आॅक्टोबरला सुरतला गेला. जाण्याआधी त्याने भावाला माहिती दिली. यावेळी सागर व जया फेसबुक कॉलिंग व फोनवर संपर्कात आले होते. तेव्हा सागर याने मी सुरत येथे असल्याचे जयाला सांगितले. त्यावर जया याने तू इतक्या जवळ आलाच आहे, तर अजमेरला (राजस्थान) ये मी पण तेथे येते असे सांगितले, त्यानुसार दोघांनी नियोजन केले आणि ६ आॅक्टोबरला सायंकाळी रेल्वेने अजमेरला पोहचले. दोघाना भेटून प्रचंड आनंद झाला. तेथून दोघांनी प्रार्थनास्थळावर जावून दर्शन घेतले. त्यानंतर एका हॉटेलवर दोघांनी मुक्काम केला. तेथे दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. जया हिने कोलकाता येथे घरी जावू. माझ्या आई, वडीलांना भेटू ते लग्नाला होकार देतील असे सांगितले,अजमेर येथून दोघे जण ९ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे गेले.
पोलिसात हरविल्याची नोंद
दुसरीकडे सागर परत का येत नाही, संपर्क होत नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून हरविल्याची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी तपासासाठी सहायक फौजदार गोपाळ चौधरी व भूषण पाटील यांची नियुक्ती केली. प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे आले.
पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करुन या तपासासाठी हवालदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे या दोघांना रामानंद नगर पोलिसांच्या मदतीला दिले. संयुक्त पथकाने केलेल्या तपासात सागर हा कोलकाता येथे असल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार पथकाने तेथून सागरला ताब्यात घेतले.
असा झाला प्रेम भंग आणि शेवट....
कोलकाता येथे गेल्यावर जया याने सागरला एक दिवस हॉटेलवरच मुक्काम करायला लावला. दुसऱ्या दिवशी जया सागरला घेऊन मावशीकडे गेली. मावशीला लग्नाची कल्पना देण्यात आली. आई, वडीलांना राजी करते सांगून जया हिने काही दिवस सागरला मावशीकडेच थांबायला सांगितले. कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच या मावशीकडे पोलिसांचे पथक धडकले. त्यावेळी जयालाही बोलावण्यात आले. जया कुटुंबाचा होकार मिळविण्यात त्या काळात अपयशी ठरली तर दुसरीकडे सागरला घ्यायला पोलीस आल्याने दोघंही संकटात सापडले. शेवटी दोघांनी भविष्याचा विचार केला, कुटुंबावर बेतणारा प्रसंग, समाजात होणारी बदनामी, पालकांचा विश्वासघात, त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या साºया गोष्टीची दोघांना जाणीव झाली आणि झालं गेलं विसरुन दोघंही आपआपल्या घरी परतले.