राजकारणामुळे मैत्रीला बंधने : ‘जय आणि विरू’ची होतेय ताटातूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:22 PM2018-07-17T12:22:26+5:302018-07-17T12:23:17+5:30
नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या
सुशील देवकर
जळगाव : ‘शोले’ चित्रपटातील ‘जय आणि विरू’च्या जोडीची मैत्रीची उपमा आजही अनेक मित्रांना दिली जाते. मनपातील आजी-माजी नगरसेवकांमधील अशा ‘जय आणि विरू’ची मात्र राजकीय उलथापालथीमुळे ताटातूट झाली आहे. तर काहींनी राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपली आहे.
जुन्या नगरसेवकांमधील पांडुरंग काळे-प्रकाश बाबुराव पाटील, शिवचरण ढंढोरे- पांडुरंग काळे, विजय कोल्हे- गफ्फार मलिक, पुष्पा पाटील-सिंधुताई कोल्हे अशा अनेक जोड्यांची मैत्री प्रसिद्ध होती. तर नव्या नगरसेवकांमध्ये सुनील महाजन- ललित कोल्हे, अश्विन सोनवणे- सुनील महाजन, पृथ्वीराज सोनवणे-रवींद्र पाटील, अनंत जोशी-ललित कोल्हे, शाम सोनवणे-सुनील महाजन, वर्षा खडके-भारती जाधव, अशा जोड्या प्रसिद्ध आहेत. मात्र राजकारणाच्या उलथापालथीमुळे जुन्या नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या. अन् आता नवीन नगरसेवकांच्याही जोड्या यंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या आहेत.
अनंत जोशी व ललित कोल्हे यांची जोडी महाविद्यालयापासूनची. राजकारणातही सोबत राहिले. मनसेत दोघांनी सोबत राहून काम केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तर अनंत जोशी शिवसेनेत गेले. सुनील महाजन व ललित कोल्हे यांच्याबाबतही तसेच झाले.
खाविआ व मनसेची सत्तेत भागीदारी असताना दोघांची मैत्री चर्चेचा विषय बनली. त्यामुळेच जेव्हा ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा सुनील महाजनही भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. मात्र राजकारण व मैत्री आपआपल्या जागी असते हे सुनील महाजन यांनी कोल्हेंवर टीका करून सिद्ध केले. पृथ्वीराज सोनवणे व रवींद्र पाटील ही जोडीही मनपात कायम सोबत असायची. भाजपाकडून नगरसेवकपदाची पहिलीच टर्म असताना दोघांनी सोबतच अनेक विषय लावून धरले.
मात्र उमेदवारीत सोनवणेंवर अन्याय झाला अन त्यांनी शिवसनेचा धनुष्यबाण हाती घेतला. रवींद्र पाटील यांना मात्र खडसेंच्या यादीत स्थान मिळाल्याने भाजपाची उमेदवारी मिळाली. वर्षा खडके-भारती जाधव यांच्यातील मैत्रीही जुनीच आहे. ती त्यांनी अजूनही जपली आहे. यंदा तर दोघी मैत्रिणी शिवसेनेकडूनच एकाच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.