मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर
By सुनील पाटील | Published: July 1, 2023 04:49 PM2023-07-01T16:49:54+5:302023-07-01T16:50:15+5:30
भारत जोडो अभियानाच्या संमेलनाला सुरुवात
जळगाव : स्वप्नात जगायला, स्वप्न बघण्याच्या अधिकारावर आज गदा आलेली आहे, अशा पध्दतीची हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठे संकट घालविण्यासाठी सर्व मिळून आघाडी बनविण्याची गरज आहे आणि या आघाडीला निवडून आणावे, असे आवाहन डॉ.भारत पाटणकर यांनी शनिवारी भारत जोडो अभियानातंर्गत कार्यकर्ता संमेलनात केले.
भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात अध्यक्षीय भाषणात पाटणकर बोलत होते. व्यासपीठावर सुभाष वारे, चंद्रशेखर शिखरे, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, करीम सालार, लीना पवार, विजय महाजन (दिल्ली), अजित झा, निता मिश्रा (उत्तर प्रदेश), एच.एम.देसर्डा, फैजल खान आदी उपस्थित होते. नांगर पूजन व शिवरायाच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन संमेलनाचे उद्घाटन झाले.
पाटणकर पुढे म्हणाले की, नवा भारत निर्माण करण्यासाठी सजग राहण्याची गरज असून भारत जोडो सोबत माणूस जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यापेक्षा चार पट मोठे संमेलन घेऊ, महिनाभरात त्यासाठी समित्या स्थापन करु असेही त्यांनी नमूद केले.
समाजात भांडण लावण्याचे षडयंत्र
सध्या समाजासमाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जातीय दंगली घडवून आणल्या जाताहेत. जगण्याची साधणं हिसकावली जात आहेत. गरीब अधिक गरीब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. त्यावरुन षडयंत्र समजून घ्या, असे आवाहन सुभाष वारे यांनी केले. १९५० मध्ये खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. त्याआधी फक्त २२ टक्के लोकांनाच मतदान करता येत होते. १९५० मध्ये संविधानाने स्वातंत्र्य दिले अन् झोडतीला माणूस मतदान करु लागला. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या प्रारंभी शाहीर रमेश धुरंधर यांनी क्रांती गीत सादर केले. रविवारी संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यासह परराज्यातील प्रतिनिधी यात सहभागी झालेले आहेत.