महामार्गावर ओव्हरटेक करताना दोन ट्रक धडकले समोरासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 04:12 PM2019-02-10T16:12:53+5:302019-02-10T16:14:47+5:30
जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजता पाळधी बायपास महामार्गावर झाला.
जळगाव : जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजता पाळधी बायपास महामार्गावर झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलीम हा व त्यांचा मुलगा क्लिनर मो. नासीर हे दोघं शनिवारी रात्री १० वाजता अकोला येथून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.४९ टी.८७८४) तूर डाळ घेऊन मुंबई जात होते तर अरविंदकुमार राय (रा.भिलाई, छत्तीसगड) हा मुलगा क्लिनर धनंजयसह मालेगाव येथून ट्रकमध्ये (क्र.सी.जी.ए.डब्यु.८७३९) कांदा घेऊन छत्तीससगड येथे जात असताना राष्टÑीय महामार्गावर पाळधी बायपासजवळ मो.इस्लाम खान याचा ट्रक ओव्हरटेक करीत असताना कांद्याच्या ट्रकवर धडकला.त्यात ट्रकचा चक्काचूर होऊन मो.इस्लाम खान जागीच ठार झाला. तर मुलगा नासीर जखमी झाला. कांद्याच्या ट्रकमधील चालक अरविंदकुमार रॉय व मुलगा धनंजय हे दोन्ही जखमी झाले.
क्रेन मागवून काढला मृतदेह बाहेर
या अपघातात डाळीच्या ट्रकचा चुराडा झाला असून मो.इस्लाम खान हा कॅबीनमध्ये दाबला गेला होता. मृतदेह बाहेर काढणे शक्यच नव्हते. त्यामुळे पाळधी महामार्गाचे उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी क्रेन मागवून दोन्ही ट्रक बाजुला केला व पत्रा कापून अडकलेला मृतदेह बाहेर काढला.मृतदेहासह जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. यावेळी रस्त्यावर कांदेच कांदे झाले होते. दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. दिलीप पाटील व त्यांच्या सहकाºयांनी वाहने हटवून वाहतुक सुरळीत केली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेंद्र बिष्णोई यांच्या खबरीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कॉन्स्टेबल प्रकाश पाटील व अभिजीत सैंदाणे यांनी पंचनामा केला. शून्य क्रमांकाने हा गुन्हा धरणगाव पोलीस स्टेशनला वर्ग होणार आहे.