अंतर्गत दुफळी हीच भाजपासाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:52 AM2019-03-17T11:52:19+5:302019-03-17T11:53:32+5:30
चाळीसगाव तालुका
चाळीसगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीचे वर्चस्व आणि विधानसभेत भाजपाचे 'कमळ' फुललेले. चाळीसगाव तालुक्याच्या राजकीय सारीपाटावरील हे चित्र. मात्र २०१४ नंतर ही समीकरणे बदलली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपाने मुसंडी मारली असली तरी, अंतर्गत गटबाजी त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. दिलजमाई न झाल्यास राष्ट्रवादीच्या 'घड्याळाला' ही रसद चावी भरण्यासाठी मदतगार ठरु शकते. असे सध्याचे चित्र आहे.
एकेकाळी काँग्रेस - राष्ट्रवादीचे तालुक्यावर एकहाती वर्चस्व होते. १९८९ मध्ये भाजपाने या वर्चस्वाला पहिल्यांदा तडाखा दिला. गेल्या ३० वर्षात २००९ ते २०१४ या पाच वषार्चा अपवाद वगळता राष्ट्रवादीला विधानसभेत भाजपाला मात देणे शक्य झाले नाही.
ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि भाजपाचे प्राबल्य आहे. शिवसेनेची धडपड मात्र सुरु असते. स्व. पप्पू गुंजाळ यांनी २०१४ मध्ये शिवसेनेला मोठे बळ दिले होते. अलिकडे काँग्रेस देखील प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
२०१४ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेची समीकरणेही बदलली असून सद्यस्थितीत भाजपाच्या सत्तेला सेनेचाच 'टेकू' आहे.
आता युती झाल्याने भाजपाला याचा फायदा होईल. अर्थात यासाठी सेनेला विश्वासात घेऊन त्यांना जवळ बसवावे लागणार आहे.
गेल्या साडेचार वर्षात आमदार उन्मेष पाटील यांनी सेनेशी समन्वय साधतांना बाजार समिती व पालिकेत सत्तांतर घडवून आणले. दुसरीकडे भाजपातील 'नवे - जुने' ही दुफळी अलिकडे तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. आमदारांना डावलून एका गटाकडून स्थानिक कार्यक्रम होत आहे.
त्यामुळे प्रचाराच्या मोहिमेवर निघण्यापूर्वी दूफळीवर उपाय करावा. असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
गुलाबराव देवकर तालुक्याचे भूमिपूत्र
राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांनी लोकसभेचा प्रचार सुरु केला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. देवकर हे तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. तालुक्यातील 'पळासरे' हे त्यांचे मूळ गाव आहे.