एफएसआयच्या नियमांमुळे बांधकाम क्षेत्राला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:56+5:302020-12-11T04:42:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चटई निर्देशांकांच्या (एफएसआय) नियमांमध्ये नव्या बांधकाम नियमावलीत बदल झाला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आनंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चटई निर्देशांकांच्या (एफएसआय) नियमांमध्ये नव्या बांधकाम नियमावलीत बदल झाला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वीपेक्षा जास्त एफएसआय मिळणार आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फी भरून आणखी जादाचा एफएसआय मिळवता येणार आहे.
राज्य सरकारने नुकतीच बांधकामक्षेत्रासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक, सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट यांना त्याचा फायदा होणार आहे. नव्या नियमांमुळे चटई निर्देशांक वाढून मिळणार आहे. त्यात ९ ते १२ मीटर रस्ता असेल, तर २ एफएसआय, १२ ते १५ मीटर रस्ता असेल तर २.२५, १५ ते २४ मीटरसाठी २.५० एफएसआय दिला जाणार आहे. तसेच ३० मीटर रस्ता असेल तर अतिरिक्त फी भरून रहिवास आणि व्यावसायिक वापरासाठी जादाचा एफएसआय दिला जाणार आहे. या अतिरिक्त एफएसआयसाठी बांधकाम व्यावसायिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांना अतिरिक्त फी द्यावी लागणार आहे.
२०१६ला आलेल्या नियमांमुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला होता. मात्र आताचे नियम हे या व्यवसायाच्या वाढीसाठी अनुुकूल आहेत.
शहरालगतच्या भागाचे काय
जळगाव शहरालगत असलेल्या आव्हाणे, सावखेडा, कुसुंबा या भागांत ग्रामपंचायत असली तरी तेथे विकास होण्यास वाव आहे. मात्र त्याचे नियम वेगळे आहेत. ग्रीन झोनच्या नियमांमुळे मोठी अडचण होते. मात्र नव्या नियमावलीने तेथेही विकासाला काहीसा वाव मिळणार आहे.
कोट - राज्य सरकारने बांधकाम उद्योगांसाठी आणलेली नवी नियमावली ही फायदेशीर आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोघांचा फायदा होणार आहे. त्यासोबतच शहरालगत असलेल्या गावांच्या विकासाचा मुद्दाही सोडवला तर जास्त फायदा होईल
- गनी मेमन, बांधकाम व्यावसायिक
कोट - नवीन बांधकाम नियमावलीतील एफएसआयच्या नियमांचा फायदा होणार आहे. त्यामुळे विकासाला वाव मिळेल. तसेच अतिरिक्त एफएसआय घेता येणार आहे. हे नियम बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोन्हींच्या फायद्याचे आहे.
- अब्बास मकरा, क्रेडाई