मनपा कर्मचारी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:37+5:302021-06-01T04:13:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील ३५ कर्मचारी सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महापालिकेत आयोजित कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील ३५ कर्मचारी सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महापालिकेत आयोजित कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कर्मचाऱ्यांसोबत आलेल्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे सभागृहात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती, त्यानंतर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सभागृहाबाहेर जाण्याची विनंती केल्यानंतर सभागृहातील गर्दी काही प्रमाणात कमी झाली होती.
कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शहरभर कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी दंड आकारात असतांनाच, दुसरीकडे सोमवारी मात्र महापालिकेतच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसून आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे स्वतः उपस्थित होते. मनपाचे एकूण ३५ कर्मचारी सोमवारी निवृत्त झाले. यानिमित्त मनपा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्तांनी कार्यक्रमाच्या आधीच या कार्यक्रमादरम्यान गर्दी न करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसोबत अनेक नातेवाईक देखील आले असल्याने सभागृहात अक्षरश नागरिकांची झुंबड उडाली. सभागृहात पाय ठेवण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती. अखेर मनपा आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. आयुक्तांनी सूचना दिल्यावर देखील अनेक कर्मचारी व त्यांचे नातेवाईक सभागृहातच थांबून होते, तासभर चाललेल्या या कार्यक्रमात मनपाचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते.