लॉकडाउननंतर इंधन विक्रीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:17 PM2020-03-30T17:17:39+5:302020-03-30T17:18:38+5:30
सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ते ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे.
डिगंबर महाले
अमळनेर, जि.जळगाव : सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ते ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे.
याबाबत येथील पेट्रोल पंपचालक लालचंद सैनानी यांनी सांगितले की , माझ्या पेट्रोल पंपावर रोज साडेतीन हजार लीटर पेट्रोल तर आठ ते नऊ हजार लीटर डिझेल विक्री होत होती. हल्ली लॉकडाऊन झाल्यानंतर हजार ते बाराशे लीटर पेट्रोल व अडीच-तीन हजार लीटर डिझेल विक्री होत आहे. याची कारणमीमांसा देताना ते म्हणाले की, हल्ली रोडकाम करणारे कंत्राटदार व मजूर, क्रशर मशीन वीट भट्टी, बाहेरगावी फिरस्ती करणारे, पॅसेंजर वाहू गाड्या बंद आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल यांच्या खपावर खूप मोठा परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवांपुरतेच वाहनांना आम्ही बॅचेस पाहून पेट्रोल-डिझेल देतो. त्यात दूध वाहक, किराणा व्यावसायिक, मेडिकल व्यावसायिक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस पत्रकार, किराणा दुकानदार यांना बॅचेस पाहून पेट्रोल-डिझेल देत आहोत. शिवाय पेट्रोल पंप यापूर्वी १७ ते १८ तास सुरू असायचा. आता फक्त सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सहा इतकाच वेळेपर्यंत पेट्रोल पंप सुरू असतो. वेळेत घट झाल्यामुळेसुद्धा व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. परंतु सर्वाधिक परिणाम हा लॉकडाऊनमुळे झालेला आहे.