पलायन केलेल्या डॉक्टरचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:00 PM2020-06-01T13:00:34+5:302020-06-01T13:01:13+5:30
धक्कादायक
शिरसोली, ता. जळगाव : ज्या डॉक्टर्सने रुग्णांना कोरोनाबाबतचे धडे द्यायचे, त्या कोरोना संशयित डॉक्टरनेच स्वॅबचा अहवाल येण्याअगोदरच रुग्णालयातून पलायन केले. हा डॉक्टर घरी पोहोचताच त्याचा अहवाल आला अन् तो अहवाल पॉझिटीव्ह निघाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. काही दिवसांपूर्वी शिरसोली येथीलच एका महिलेने क्वारंटाईन असतानाही पलायन केले होते. त्यामुळे कोविड कक्षातील सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.
शिरसोली बारीनगर येथील रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कातील डॉक्टर व नातेवाईकांना क्वारन्टाईन करण्यात आले होते. परंतु शिरसोली प्र. नं. येथील डॉक्टर क्वारनटाईन असताना त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. परंतु, त्याचा रिपोर्ट येण्याअगोदरच हा डॉक्टर ३१ मे रोजी दवाखान्यात कुणालाही काही न सांगता रात्री शिरसोली येथील घरी निघून आला होता. परंतु डॉक्टर घरी येताच त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाल्याचे समजते. यापूर्वी शिरसोली येथील क्वारंटाईन केलेली महिला व आता डॉक्टर परस्पर घरी निघून आल्याने कोविड कक्षातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान डॉक्टरची पत्नी, लहान मुलगा व कंपाऊंडर मुलगा याना क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे.
आरोग्य विभाग लागला कामाला.
शिरसोली प्र. बो. येथे पाच तर शिरसोली प्र. नं. येथे एक असे सहा रुग्ण आढळल्याने शिरसोली प्र. बो. येथील कंटेनमेंट झोन सतरा झाले असून शिरसोली प्र. नं. येथील कन्टेनमेंन्ट झोन अठरा झाले आहेत. याठिकाणी ग्रामस्थांच्या ताप, खोकला व इतर आजार तपासणीचे काम सुरु आहे. बाधित विभागात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी जंतुनाशकांची फवारणी करत असून डॉक्टराच्या संपर्कात कुणी आले आहे का? याची तपासणी केली जात आहे. डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. प्रशांत गर्ग, एन. जी. चौधरी, अनिल महाजन, सलीम पिंजारी, हारिष गुरुबा, गोपाल बारी, प्रमोद गजरे यांची टीम परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.