फुईचिरा, बोळावणलाही भारी माहेरची साडी पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:48 PM2019-08-31T15:48:59+5:302019-08-31T17:16:41+5:30
पती, पुत्र व कन्या छत्र हरवलेल्या कळमडू, ता.चाळीसगाव येथील रेशमाबाई रामसिंग मरसाळे (वय ७०) या नात्याने वडिलांची बहीण (खानदेशी शब्द फुई, आत्या) असलेल्या वृद्धेला खेडगावातील मातंग समाजातील नेटारे कुटुंबातील त्यांच्या भाच्यांनी तिथे जात मायेचे छत्र धरत, आपल्या नात्याला जागल्याची अनुभूती दिली.
संजय हिरे/कैलास अहिरराव
खेडगाव, ता.भडगाव/कळमडू, ता.चाळीसगाव : पती, पुत्र व कन्या छत्र हरवलेल्या कळमडू, ता.चाळीसगाव येथील रेशमाबाई रामसिंग मरसाळे (वय ७०) या नात्याने वडिलांची बहीण (खानदेशी शब्द फुई, आत्या) असलेल्या वृद्धेला खेडगावातील मातंग समाजातील नेटारे कुटुंबातील त्यांच्या भाच्यांनी तिथे जात मायेचे छत्र धरत, आपल्या नात्याला जागल्याची अनुभूती दिली.
हा झाला तात्पुरता दिलेला हात किंवा आधार. वृद्ध, दोन्ही डोळ्यांनी न दिसणाऱ्या रेशमाबाईचे ऊर्वरित जीवन सुकर होणेकामी तिला कायमचा आधार किंवा तिचे अर्धवट घरकुलाचे हरवलेले छत्र मिळवून देण्याकामी ‘लोकमत’ हा सामाजिक विषय समाजमनापुढे ठेवत आहे.
झाले असे, आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या निधनाच्या निमित्तानं खेडगाव येथील राजेंद्र उर्फ अशोक युवराज नेटारे हे कळमडू येथून जात असताना, दारावरुन चाललो म्हणून आपल्या वृद्ध आत्याची ख्याली-खुशाली घेण्यासाठी तिला भेटून घेऊ या कारणाने आत्या रेशमाबाईच्या घराकडे वळले. तेथे गेल्यानंतर आत्याची भिकाºयासारखी अवस्था पाहून त्यांना उचंबळून आले. दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. केसांच्या जटा क्षणभर भीती वाटावी अशा हातभर वाढलेल्या, महिनो-महिने अंगाला पाणी नसल्याने सुटलेली दुर्गंधी, तुटलेली खाट, तिला चिंध्या बांधून कशीबशी पेटी, विटावर ठेवत तिच्यावर अवघडलेल्या स्थितीत बसलेली. मंजूर घरकुलाच्या चार भिंतीच्या आड ते अपूर्णावस्थेत असल्याने डोक्यावर छत्र नाही. पत्ते खेळणाऱ्यांना कीव आली म्हणून उन्हाळ्यात तिच्यावर हिरवी नेट बांधली खरी, मात्र पावसाळा रेशमाआत्या पावसाच्या धारा अंगावर झेलत काढत होती. कुणीतरी जाड मेनकापड तिला गुंडाळलेले. ते गहीवरले. आत्याची विचारपूस करून तडक घरी आले.
दुसºयाच दिवशी त्यांनी आपली काकू व मेहुणबारे येथे आरोग्यसेविका असलेल्या सुनंदाबाई छगन नेटारे, चुलतभाऊ शरद नेटारे यांना निरोप पाठवून कळमडू येथे बोलावून घेतले. पत्नी मीनाबाई, मुलगा गोपाळ व सुन मुक्ता यांना सोबत घेतले. बरोबर रिक्षातून एक खाट, ताडपत्री, एक साडी व जीवनावश्यक वस्तू घेत कळमडू येथे आले, आत्याची अंतिम सेवा होईल तेव्हा पण जिवंतपणीचा सेवा सोहळा अंगणात सुरू झाला. केसांच्या गुत्ता झालेल्या जटा भावजयी सुनंदाने कमी केल्या, नात सुन मुक्ताने चांगली घासून आंघोळ घातली. भाचा अशोक, शरद यांनी सोबत आणलेली माहेरची साडी नेसवली. आत्या खुलून निघाली. शेजारी-पाजारी गर्दी करून हा सेवा सोहळा पाहत नेटारे कुटुंबाला देव तुमचं भले करो, अशी दुवा देत होते. आजीला घरकुलाच्या चार भिंतीच्या आड नवीन खाट, अंथरुण टाकून बसवले. डोक्यावर छत्र नसल्याने सोबत आणलेली ताडपत्री दोन बांबूच्या साहाय्याने टांगली. आत्याशी चार गोष्टी, विचारपूस झाली. खेडगावी जावू, असा आग्रह धरला. आत्या मात्र माझ्या गावीच बरी. मला इथंच मरण येऊ देत. यावर ठाम. शेवटी आजूबाजूच्या आयाबहिणींना आत्याची काळजी घेण्याचे सांगून ते खेडगावी परतले.
खान्देशात घरात विवाह सभारंभ असला म्हणजे बस्त्यात वडिलांच्या बहिणीला फुईचिरा काढला जातो किंवा तिच्या निधनानंतर शेवटची बोळावण घेतली जाते. अशा पद्धतीने आनंद व दु:ख या दोन्ही प्रसंगात या वस्राला एक माहेरचा मान म्हणून वाडवडिलांनी नात्याला जपणारी व्यवस्था भलेही करुन ठेवली असली तरी रेशमाबाईच्या भाच्यानी तिच्या जिवंतपणी केलेली तिची सेवा व तिला नेसवलेल्या माहेरच्या साडीने काही काळ का असेना तिला मायेची ऊब मिळाली असणार. फुईचिरा व बोळावणलाही ती पुरुन ऊरणारी आहे.
शेजारधर्म निभावणाºया आयाबहिणींचे अन्नछत्र
रेशमाबाईंना दोन मुले व एक मुलगी होती. ते वारले. नाही म्हटल्यास धाकटी सून व नातू आहेत. मात्र बाहेरगावी राहतात. जोवर अंगात बळ होत तोवर त्या दोन घरचे काम करत. जवळील पोहरे या गावी भाकर-तुकडा मागून भूक भागवली. डोळे अंध झाले. तशी त्यांनी खाट धरली. आजूबाजूला चर्मकार व दलित समाजाची घरे आहेत. त्या भगिनीच अन्न वाढतात. आपला शेजारधर्म निभावणाºया आया-बहिणींचे अन्नछत्र त्यांच्यासाठी जीवनदान ठरत आहे.
वराहवतार रुपी अशीही सेवा
जगाच्या पाठीवर सर्वकाही मिळेल, पण वृद्धापकाळी शरीर जर्जर झाल्यानंतर उडणारी घाण आवरण्यास पैसे देवूनही सेवा मिळत नाही. कुणी आवरत नाही, दोन्ही डोळ्यांनी अधू झालेली रेशमाबाई त्याला अपवाद नाही. परमेश्वराने मात्र त्यांच्यासाठी जणू काही व्यवस्था करुन ठेवलीय. त्या राहत असलेल्या चार भिंंतीआड एका कोप-यात एक झुडूप उगवले आहे. त्याच्याआडच त्यांचे शौचालय. सरकत-सरकत त्या आपला प्रात:र्विधी उरकतात. घरकुल दरवाजा नसल्याने सताड उघडे असते. त्यातून डुकरे आत येत आपले कर्तव्य पार पाडतात. यामुळे घाण होत नाही अन्यथा कल्पनाच करवत नाही अशी दुर्गंधी उठली असती.
मामा अन् मावशा तसेच फुई (आत्या) अन् भाचा-भाची या नात्याला जपणारी नातेसंबंधाची विण कधीकाळी घट्ट होती. आजच्या काहीशा पुढारलेल्या समाजात ती ढिली झाल्याचे भलेही पहावयास मिळत असले तरी खेडगावच्या नेटारे कुटुंबाने या ऋणानुबंधाच्या गाठी सैल होऊ दिलेल्या नाहीत हाच एक दिलासा.