प्राथमिक गरजांची पूर्तता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:35 AM2018-04-28T11:35:03+5:302018-04-28T11:35:03+5:30
विजयकुमार सैतवाल
वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा गाजावाज करीत जळगावात वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारण्याचा तयारी सुरू आहे. मात्र रुग्णांना आवश्यक बाब असलेले औषधीच उपलब्ध करून दिली जात नसल्याने तसेच पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने हैराण झालेल्या रुग्णांकडून आता किमान प्राथमिक गरजा तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना वैद्यकीय खाते मिळाल्यानंतर जळगावात वैद्यकीय संकूल उभारण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या व येथे हे संकूल मंजूर झाले. यासाठी चिंचोली शिवारात जागा निश्चित होऊन ती वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीतही झाली. मात्र येथे बांधकाम होईपर्यंत जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात आवश्यक बदल केले जात आहे. इतकेच नव्हे या वर्षापासूनच वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र येथे प्राथमिक गरजांचे चित्र पाहता रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता आरोग्य विभागाकडून येणारा निधी यासाठी खर्च करता येत नाही. त्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची पूर्तताच सुरू असल्याने वैद्यकीय विभागाकडूनही सहजासहजी निधी मिळत नाही. तसे पाहता आॅक्टोबर २०१७मध्ये जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्यानंतर जवळपास पाच महिने आरोग्य विभागाकडून औषधी, आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र आता जिल्हाभरातील रुग्णालयांमध्येच सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याने आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रुग्णालयांमध्ये औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यात आता निधीदेखील संपल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असलेल्या जिल्हा रुग्णालयाने त्यांनाच व्यवस्था करण्याचे कळविले. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून मनोविकारावरील औषधी संपल्याचे रुग्णांना सांगितले जात आहे. जिल्हा भरातील मनोरुग्ण येथे औषधी घेण्यासाठी येत असतात. मात्र औषधीच नसल्याने त्यांना माघारी परतावे लागते. तसेच ही औषधी बाहेरून खरेदी करा, असे सांगून ती लिहून दिली जाते, मात्र अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांचे हाल होतात. औषधीसाठी वारंवार चकरा मारल्या तरी औषधी मिळत नाही. या बाबत विचारले असता उद्धटपणे उत्तर दिले जाते, असे रुग्णांचे म्हणणे आहे. खोकल्याचेही औषधी येथे उपलब्ध नाही. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय संकुलाचे स्वप्न पूर्ण होत असताना प्राथमिक गरजांचीही पूर्तता करा, असाच सूर उमटत आहे.