फुल फुलोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:36 PM2018-02-13T12:36:07+5:302018-02-13T12:39:22+5:30
बुक शेल्फ
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १२ - जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी प्रमुख असलेले प्रा.डॉ. किसन पाटील यांचा ‘फुल फुलोरा’ हा काव्यसंग्रह. सर्जनशील लेखक, कवी, समीक्षक आणि संशोधक मार्गदर्शक असलेल्या प्रा.डॉ.पाटील यांची याआधी २० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. भाव विश्वातल्या भाव आणि भावनांचे प्रतिबिंब प्रा.डॉ.पाटील यांनी ‘फुल फुलोरा’मध्ये फुलवले आहे. बालपण जसे रम्य असते, तसे ते नटखटही असते. बालपणीच्या सुखाच्या आठवणी चिरंतन ठेवा असतात. आई-बाबांचे संस्कार, नात्या-गोत्याचा जिव्हाळा, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाची प्रयोगशाळाच असते ते बालपण. या काव्यसंग्रहाची सुरुवातच बालपण या कवितेने झाली आहे. ‘कसं विसरेन माझं नटखट बालपण, हरिणांच्या उड्यांसवे, जगलेलं सानपण, छळतात मला आता, गोडगोड आठवणी, मनमुराद खेळलो, सारेच मित्रमैत्रिणी’ अशा काही बालपणीच्या आठवणी कवी सांगतात. याही पुढे जावून नदीकाठचे खेळणे, झाडा-फुलांशी मैत्री, निसर्गातले मस्त हिंदळणे, तळ्या-मळ्यात समरसणे, मित्रमैत्रिणींची आंगतपंगत, मोराचा पिसारा, सुगरणीचा खोपा, बैलगाडीतली सफर, मामाच्या गावच्या आठवणी हे सारे काही बालविश्वाचे फुलणे असते. भावविश्वातले रमणे असते. यात बालकांना भावणाºया वेगवेगळ्या अशा ४६ कविता आहेत. त्यात आईतला देव, माय मोठा मी होईन, माझी ताई, आबांचे व्यायाम, नाव आहे माझं ढोम्या, मामाचा गाव, स्वप्नातल्या पºया, माझ्या लाडक्या बाहुल्या, झाडाचं रडगाणं, अशी मजा पावसाची, झडीचा पाऊस, चांदोबाशी कट्टी फू, नंदीबैल, सण आला हा पोळ्याचा, होळी अशा काही कविता लक्ष वेधून घेतात. त्याला साजेशी सुंदर चित्रेही कवितांसोबत रेखाटली आहेत. तीही मनाला भावतात.
कवी : प्रा.डॉ.किसन पाटील, प्रकाशक : अथर्व प्रकाशन, पृष्ठे : ४८, मूल्य १०० रुपये.
- रवींद्र मोराणकर