आयएमएच्या डॉक्टर्सची पूर्ण वेळ सेवा सुरु - आयएमए अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:40 PM2020-06-07T12:40:16+5:302020-06-07T12:42:27+5:30
चार डॉक्टर कार्यरत
आनंद सुरवाडे
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला. मात्र, त्यासाठी आयएमएने स्वत: पुढाकार घेऊन २५० डॉक्टरांची शासकीय पातळीवर सेवा देण्यासाठी नियुक्ती केली आहे़ एवढेच नव्हे तर अधिग्रहीत रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी दिली़ जळगावच्या कोविड रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतह्णलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध बाबी उलगडून सांगितल्या.
प्रश्न : कोविड रुग्णालयात आयएमएचे नेमेक किती डॉक्टर्स व किती वेळ सेवा देत आहे?
डॉ़ पाटील : कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची खरच कमतरता आहे़ हा मुद्दा ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आयएमएच्या २५० डॉक्टरांची कोविड रुग्णालयात सेवा लावण्यात आली आहे़ यात सकाळी दोन डॉक्टर्स तीन तास व सायंकाळी दोन डॉक्टर्स चार तास असे चार डॉक्टर दिवसातून सहा तास या रुग्णालयात सेवा देत आहे़
प्रश्न : डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत नसल्याचा आरोप आहे़
डॉ़ पाटील : तसे नाही, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार तीन तास सेवा देणे पुरेसे आहे़ त्यादृष्टीने ही या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिवाय अधिग्रहीत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्ण वेळा सेवा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही़
प्रश्न : अमळनेर पॅटर्न जळगावात का राबविला जात नाही?
डॉ़ पाटील : अमळनेर हे त्यामानाने छोटे शहर आहे़ त्या ठिकाणी डॉ़ अरविंद शिंदे यांनी कोविडसाठी रुग्णालय खुले करून दिले होते़ जळगावात अधिग्रहीत रुग्णालयात शुक्रवार ५ जूनपासून खासगी डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा देत आहेत. त्यामुळे अमळनेर पॅटर्न असा वेगळा राबविण्याची गरज नाही़
डेथ आॅडिट कमिटीचे उद्दीष्ट काय?
काही बाबींची अपूर्णत: असणे, मनुष्यबळाचा अभाव यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहेच़ या बाधितांच्या मृत्यूमध्ये नेमके चुकले कुठे काहींचे प्राण वाचविता आले असते का? कुठे काही हलगर्जीपणा झालेला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे.
जळगावला मेडिकलची पंढरी म्हटले जाते तरी रुग्ण संख्या का वाढली ?
नागरिक मास्कचा वापर नीट करीत नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. बाजार समिती, भाजीबाजार आदी ठिकाणी गर्दीवर नियंत्रण नाही, त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे़ शिवाय लोक दवाखान्यात यायला घाबरत आहेत. समोर यायला घाबरत असल्याने आजार लपविला जात आहे. यातूनही संसर्गाचा धोका अधिक आहे़ त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे़
बाधितांच्या मृत्यूचा अभ्यास केल्यास अनेक लोक थेट मृतावस्थेतच रुग्णालयात आले़ अनेकांचा मृत्यू ४ ते ६ तासाच्या आत झाला़ ज्यांना अन्य व्याधी आहेत, त्यांचे प्रमाण अधिक आहे़ - डॉ़ दीपक पाटील, अध्यक्ष, आयएमए जळगाव