मिनी मनपासाठी मिळणार २५ कोटींच्या निधीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:51+5:302020-12-12T04:32:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या मुख्य इमारतीत कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आपल्या जवळच्या भागात कर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या मुख्य इमारतीत कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आपल्या जवळच्या भागात कर भरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी प्रभाग समिती कार्यालय अधिक सक्षम करून या ठिकाणी मिनी मनपाचे कार्यालय सुरू करण्याची तरतूद तत्कालीन सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी केली होती. यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. या निधीच्या मान्यतेचा प्रस्ताव ॲड. हाडा यांनी १६ रोजी होणाऱ्या महासभेत ठेवला आहे.
१६ रोजी तब्बल अडीच महिन्यांनंतर मनपाच्या ऑनलाइन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या महासभेत एकूण ४१ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये १२ विषय शासकीय असून, उर्वरित २९ विषय हे अशासकीय स्वरुपाचे आहेत. मात्र, ऐनवेळच्या विषयांवर ही सभा गाजण्याची शक्यता आहे. यामध्ये घनकचरा प्रकल्प, अमृत योजनेंतर्गत वाॅटर मीटरचा विषय, शहरातील रस्ते व वॉटरग्रेस आदी विषयांचा समावेश आहे.
ईईएसएल कंपनीला पु्न्हा संधी
दीड वर्षापूर्वी शहरात १५ हजार एलईडी बसविण्याचे काम देण्यात आलेल्या मात्र काम व्यवस्थित न केल्यामुळे कामबंदची नाेटीस बजावणाऱ्या महापालिकेने पुन्हा ईईएसएल कंपनीला अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी संधी दिली आहे. येत्या १६ डिसेंबर राेजी हाेणाऱ्या महासभेत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने पुन्हा नव्याने मनपाकडे डीपीआर सादर केला असून, मनपाने ईईएसएल कंपनीला संधी दिली आहे.
रस्त्यांचा कामांचे प्रस्ताव
महासभेत ९ विषय हे शहरात नवीन रस्ते तयार करणे व काही रस्ते दुरुस्ती करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यासह मेहरुण ,पिंप्राळा व शिवाजीनगर या भागातील स्मशानभूमीत गॅसदाहिणी बसविण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी सादर केला आहे. यासह घनकचरा प्रकल्पांचे सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरीचा विषयदेखील प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.