इनक्युबेशन सेंटरसाठी विद्यापीठाला २५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:01+5:302021-01-01T04:11:01+5:30
जळगाव : विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पना विकसित करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरसाठी महाराष्ट्र ...
जळगाव : विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पना विकसित करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीपैकी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून स्टार्टअप अंतर्गत नावीन्यपूर्ण उद्योजकांना चालना मिळावी यासाठी विद्यापीठात इक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने या केंद्रासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील २५ लाख रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये १० हजार स्क्वेअर फूट जागेवर हे केंद्र सुरू होणार आहे. विद्यापीठाने स्थापन केलेल्या सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजेसच्या वतीने नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. अनेकदा उद्योग सुरू करताना क्षमता असूनही उद्योग हवा तसा यशस्वी होत नाही. त्यामुळे उद्योग सुरू करताना त्यातील बारकावे आधीच माहिती झाले तर उद्योग यशस्वी होण्याचे प्रमाण वाढीला लागेल. या इनक्युबेशन सेंटरच्या वतीने उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व उद्योगाची संकल्पना रुजण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप व आत्मनिर्भर भारत अभियानाला पूरक असे या केंद्राचे काम राहील. खान्देशातील नवउद्योजक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा अधिक फायदा होईल.